**शिर्डीत साईभक्तांच्या आरोग्याशी खेळ; भेसळयुक्त, बुरशीयुक्त पेढा प्रसादावर FDAची धडक कारवाई**
**शिर्डीत साईभक्तांच्या आरोग्याशी खेळ; भेसळयुक्त, बुरशीयुक्त पेढा प्रसादावर FDAची धडक कारवाई**
**KDM NEWS शिर्डी (प्रतिनिधी):** साईबाबांच्या शिर्डी मंदिर परिसरातील खाजगी दुकानांमध्ये विकल्या जाणाऱ्या पेढा प्रसादात गंभीर भेसळ आणि निकृष्ट दर्जा आढळल्याने भाविकांच्या आरोग्याशी सुरू असलेल्या खेळाचा प्रकार उघडकीस आला आहे. बुरशी लागलेल्या, दगडासारख्या कडक आणि अप्रामाणिक पॅकेजिंग असलेल्या पेढ्यांच्या विक्रीमुळे अन्न आणि औषध प्रशासन (FDA) खडबडून जागे झाले असून, मंदिर परिसरात छापेमारी सुरू करण्यात आली आहे.
दररोज हजारो आणि वर्षाकाठी लाखो भाविक साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीत येतात. दर्शनानंतर अनेक भक्त मंदिराजवळील दुकानांमधून प्रसाद म्हणून पेढे खरेदी करतात. मात्र या पेढ्यांवर उत्पादक, पॅकेजिंग, एक्सपायरी डेट किंवा उत्पादनस्थळाची कोणतीही माहिती नसल्याचे समोर आले आहे. अनेक वर्षांपासून अशा निकृष्ट पेढ्यांची विक्री सुरू असल्याच्या तक्रारी भाविकांकडून आल्या होत्या.
**तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वात कारवाई:**
राज्यात अन्न व औषध प्रशासनाचे नवे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर भेसळखोरांविरुद्ध धडक मोहीम सुरू केली आहे. शिर्डीतील तक्रारी समोर आल्यानंतर लगेच FDAचे पथक घटनास्थळी दाखल झाले. मंदिर परिसरातील पेढा विक्रेत्यांच्या दुकानांवर छापे टाकण्यात आले असून, संशयास्पद पेढ्यांचे नमुने गोळा करून प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. दोषी आढळल्यास उत्पादक आणि विक्रेत्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे.
पथकाने विक्रेत्यांकडून उत्पादकांची माहिती घेण्याचे काम सुरू केले आहे. या कारवाईमुळे भेसळखोरांमध्ये खळबळ उडाली आहे. शिर्डी नगरपालिका आणि FDA यांच्याकडून यापूर्वी दुर्लक्ष झाल्याचेही समोर आले आहे.
**भाविकांची नाराजी:**
निकृष्ट पेढ्यांमुळे साईभक्तांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. श्रद्धेच्या नावाखाली आरोग्याशी खेळ होत असल्याचा आरोप भाविक करत आहेत. FDAने केलेल्या प्राथमिक तपासात अनेक पॅक केलेल्या पेढ्यांवर बुरशी आढळली आहे.
तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वात राज्यभरात भेसळीविरोधात सातत्याने कारवाया सुरू आहेत. शिर्डीप्रमाणेच इतर धार्मिक स्थळांवरही अशा प्रकारच्या भेसळीवर नजर ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. भाविकांनी प्रमाणित आणि स्वच्छ दुकानांमधूनच प्रसाद खरेदी करावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
ही कारवाई पूर्ण झाल्यानंतर दोषींवर फौजदारी कारवाईसह आर्थिक दंडाची शक्यता आहे.
टिप्पण्या