**बार्शी तालुक्यात पूराचा हाहाकार: भोगावती नदीला २५,००० क्यूसेक विसर्ग, ५०,००० पर्यंत धोका; ३० गावांना सतर्कतेचा इशारा**
**बार्शी तालुक्यात पूराचा हाहाकार: भोगावती नदीला २५,००० क्यूसेक विसर्ग, ५०,००० पर्यंत धोका; ३० गावांना सतर्कतेचा इशारा**
**KDM NEWS प्रतिनिधी**बार्शी, दि. २७ सप्टेंबर २०२५**: सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यात मुसळधार पावसाने भोगावती नदीला पूर आला असून, जवळगाव, हिंगणी आणि पिंपळगाव ढाळे मध्यम प्रकल्पांतून होणाऱ्या विसर्गामुळे नदीची पाणीपातळी झपाट्याने वाढली आहे. पाटबंधारे उपविभागाचे उपविभागीय अभियंता व्ही. जे. परदेशी यांनी दिलेल्या माहितीनुसार, आज सकाळी ८.३० वाजता भोगावती नदीत २५,००० क्यूसेक पाणी वाहत असून, पावसाची तीव्रता कायम राहिल्यास हा आकडा ५०,००० क्यूसेकपर्यंत पोहोचण्याचा धोका आहे. यामुळे पिंपरी (सा), हिंगणी, घाणेगाव, इर्ले , इर्लेवाडी, तडवळे, दहिटणी, सासुरे, मुंगशी, देगांव, नरखेड, डिकसळ, भोयरे, वाळूजसह ३० हून अधिक गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
काल रात्री झालेल्या ढगफुटीसारख्या पावसाने जवळगाव मध्यम प्रकल्पातून ३,५०० क्यूसेक, हिंगणी प्रकल्पातून १०,५०० क्यूसेक आणि पिंपळगाव ढाळे प्रकल्पातून ४,५०० क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. याशिवाय, ओढे-नाल्यांमधून येणारे पाणी मिळून भोगावती नदीत एकूण २५,००० क्यूसेक विसर्ग नोंदवला गेला आहे.
उपविभागीय अभियंता परदेशी यांनी नदीकाठच्या गावकऱ्यांना नदी, ओढे किंवा नाल्यांजवळ जाऊ नये, असे आवाहन केले आहे. सर्व ग्रामपंचायतींना अनियंत्रित विसर्गाबाबत सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. जिल्हाधिकारी यांनी आपत्ती व्यवस्थापन पथकांना कार्यरत केले असून, पुरग्रस्तांसाठी तात्पुरती मदत केंद्रे उभारली आहेत. शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज असून, पंचनामे सुरू आहेत.
**ग्रामस्थांना सावधानतेचा इशारा**: नदीकाठच्या गावांतील नागरिकांनी खबरदारी घ्यावी, पाण्याजवळ जाणे टाळावे आणि स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन पाटबंधारे विभागाने केले आहे.
KDM NEWS प्रतिनिधी
टिप्पण्या