**सोलापूर जिल्ह्यात पूरग्रस्त ८२ गावांत आरोग्य व स्वच्छता मोहीम तीव्र**
**सोलापूर जिल्ह्यात पूरग्रस्त ८२ गावांत आरोग्य व स्वच्छता मोहीम तीव्र**
KDM NEWS प्रतिनिधी**सोलापूर, ५ ऑक्टोबर : अतिवृष्टी व पुरामुळे जिल्ह्यातील सहा तालुक्यांतील ८२ गावांत पाणी शिरले असून, पाणी ओसरल्यानंतर साथीचे आजार रोखण्यासाठी जिल्हा परिषदेने व्यापक स्वच्छता व आरोग्य मोहीम हाती घेतली आहे. पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या सूचनेनुसार मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम राबवली जात असून, पहिल्या टप्प्यात ५३ गावांत काम पूर्ण झाले आहे.
जिल्ह्यात नद्या, ओढे व नाले दुथडी भरून वाहिल्याने पूरग्रस्त भागांत दूषित पाणी, घाण व कुजलेले अन्नपदार्थ यांमुळे आरोग्याचे गंभीर धोके निर्माण झाले आहेत. मोहिमेंतर्गत सर्व गावांत सार्वजनिक ठिकाणे, शाळा, अंगणवाड्या, आरोग्य केंद्रे, ग्रामपंचायत कार्यालये, तलाठी कार्यालये व स्मशानभूमी यांची साफसफाई सुरू आहे. जेटिंग मशिन, टँकरद्वारे पाणी फवारणी करून चिखल काढला जात असून, सेवाभावी संस्थांकडून जेसीबी व ट्रॅक्टर उपलब्ध करवले गेले आहेत.
मोहिमेच्या प्रमुख वैशिष्ट्यांमध्ये सार्वजनिक शौचालये व गटारांची निर्जंतुकीकरण, कचरा विल्हेवाटीसाठी ट्रॅक्टर व सफाई कर्मचारी नेमणे, मृत जनावरांची तातडीने विल्हेवाट लावणे, काटेरी झुडपे व प्लास्टिक संकलन यांचा समावेश आहे. शासकीय कार्यालयांतील भिजलेले फर्निचर साफ केले जात आहे. ब्लीचिंग पावडर, फिनॉल व क्लोरीनद्वारे रस्ते, पाण्याच्या टाक्या व विहिरी निर्जंतुक केल्या जात आहेत. दूषित पाणी स्त्रोत बंद करून पर्यायी स्वच्छ पाणी पुरवठा सुरू आहे; नागरिकांना उकळलेले पाणी किंवा क्लोरीन टॅब्लेट वापरण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
डासमुक्तीसाठी फॉगिंग मशिन व ऑइल फवारणी सुरू असून, साचलेल्या पाण्यात डासांची पैदास रोखली जात आहे. तात्पुरत्या निवारा केंद्रांतही स्वच्छता व्यवस्था मजबूत करण्यात आली आहे. आरोग्य शिबिरांतून नागरिकांची तपासणी करून आजार रोखण्यावर भर आहे.
श्री. जंगम यांनी सांगितले की, ग्रामस्तरीय यंत्रणा, स्थानिक प्रशासन, नागरिक व स्वयंसेवी संस्थांच्या समन्वयाने ही मोहीम कार्यक्षम आहे. पुरानंतर तातडीने उपाययोजना केल्याने गंभीर आरोग्य समस्या उद्भवल्या नाहीत. मोहीम सर्व गावांत सुरू राहणार असून, नोडल अधिकाऱ्यांकडून दैनंदिन आढावा घेतला जात आहे.
KDM NEWS प्रतिनिधी
टिप्पण्या