**महाराष्ट्रात १५ ते १८ ऑक्टोबरला वादळी पावसाचा अंदाज; शेतकऱ्यांना काढणी सुरक्षित ठेवण्याचे आवाहन**
**महाराष्ट्रात १५ ते १८ ऑक्टोबरला वादळी पावसाचा अंदाज; शेतकऱ्यांना काढणी सुरक्षित ठेवण्याचे आवाहन**
**KDM BARSHINEWS प्रतिनिधी **मुंबई : राज्यातील हवामानात पुन्हा बदल घडण्याची शक्यता वाढली असून, १५ ते १८ ऑक्टोबरदरम्यान विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात ढगाळ वातावरण व दुपारी वादळी पावसाची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) येलो अलर्ट जारी करून विदर्भ व मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांत वीज कोसळणे, मेघगर्जना व वादळी वाऱ्यांसह (४०-५० किमी/तास) मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. या कालावधीत विदर्भात २५ ते ६४ मिमी तर मराठवाड्यात ११ ते २० मिमी पावसाची नोंद होण्याची शक्यता असून, १५ आणि १६ ऑक्टोबरला पावसाचा जोर सर्वाधिक राहील.
विदर्भातील नागपूर, अमरावती, वर्धा, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यांत विखुरलेल्या ठिकाणी वादळी पाऊस पडण्याची शक्यता आहे, ज्यात काही ठिकाणी ६४ मिमी पर्यंत पावसाची तीव्रता नोंदवली जाऊ शकते. मराठवाड्यातील नांदेड, परभणी, लातूर, बीड, हिंगोली, जालना आणि धाराशिव मध्ये दुपारनंतर वादळी वारे व पावसाचा फटका बसण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रात पुणे, अहिल्यानगर, नाशिक आणि कोल्हापूर भागात हलक्या स्वरूपाचा पाऊस पडू शकतो, तर खानदेशमधील धुळे, जळगाव आणि नंदुरबारमध्ये तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. आयएमडीच्या नागपूर केंद्राने दिलेल्या माहितीनुसार, या पावसामुळे तापमानात २ अंश सेल्सिअसने घसरण होईल, परंतु रात्रीचे तापमान २२ ते २५ अंशांपर्यंत राहील.
कृषी विभागाने शेतकऱ्यांना हवामानानुसार नियोजन करण्याचे आवाहन केले असून, कापूस, सोयाबीन, भात आणि भाजीपाला यांसारख्या काढणी झालेल्या पिकांना वादळी पावसापासून व वाऱ्यापासून सुरक्षित ठेवण्याचे आवाहन केले आहे.
KDM BARSHINEWS
टिप्पण्या