**जीएसटी फसवणुकीसाठी मुंबई व्यापाऱ्याला अटक; ११.८० कोटींची महसूल हानी**
**जीएसटी फसवणुकीसाठी मुंबई व्यापाऱ्याला अटक; ११.८० कोटींची महसूल हानी**
**KDM NEWS प्रतिनिधी**मुंबई, ६ ऑक्टोबर २०२५ – महाराष्ट्र वस्तू व सेवाकर (जीएसटी) विभागाच्या विशेष मोहिमेत ३८ वर्षीय व्यापारी इब्राहीम असलम ढोलकिया यांना अटक करण्यात आली. ढोलकिया एन्टरप्राइजेस (जीएसटी आयडी: २७AMBPD१५६३G१ZG) या कंपनीचे मालक असलेल्या ढोलकिया यांनी बनावट बीजक (इनव्हॉइस) जारी करून चुकीची इनपुट टॅक्स क्रेडिट (आयटीसी) मागणी करून विभागाला ११.८० कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. ही कारवाई वित्तीय वर्ष २०२५-२६ मधील २९वी अटक ठरली.
२४ सप्टेंबर २०२५ रोजी अटक झालेल्या ढोलकिया यांना मंगळवारी मुंबईतील अतिरिक्त मुख्य न्यायिक दंडाधिकारी न्यायालयात हजर करण्यात आले. कोर्टाने त्यांना ८ ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली. सुरुवातीला पोलिस कोठडीत ठेवण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले, परंतु न्यायालयाने नंतर न्यायिक कोठडीत पाठवले.
तपासात असे उघड झाले की, ढोलकिया यांनी वास्तविक वस्तू किंवा सेवांचे पुरवठे नसताना बनावट दस्तऐवज तयार करून आयटीसीचा दावा केला. यामुळे विभागाला सुमारे १२ कोटी रुपयांची आर्थिक हानी झाली. हे प्रकरण अन्वेषण-ब शाखेच्या राज्यकर सहआयुक्त संजय पवार आणि राज्यकर उपआयुक्त मंजिरी फणसळकर यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात आले. राज्यकर सहायक आयुक्त उमेश ब. कांबळे, प्रशांत ना. बारवे, मनीषा क्षीरसागर तसेच राज्यकर निरीक्षक यांच्या तपास पथकाने ही कारवाई केली.
माझगाव येथील राज्यकर उपआयुक्त (जनसंपर्क) जनार्दन आटपाडकर यांनी जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रानुसार, विभाग नेटवर्क विश्लेषण सॉफ्टवेअरचा वापर करून आणि इतर विभागांसोबत समन्वय साधून कर चुकवे गिरी करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कडक कारवाई करत आहे. या मोहिमेत आतापर्यंत २९जणांना अटक झाल्या असून, अशा फसवणुक्यांवर आणखी वेगवान तपास सुरू आहे.
KDM NEWS प्रतिनिधी
टिप्पण्या