**पिकविमा कंपनी व कृषी आयुक्तालयात मुक्काम आंदोलन सुरू; मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा शेतकरी संघटनेचा इशारा**
**पिकविमा कंपनी व कृषी आयुक्तालयात मुक्काम आंदोलन सुरू; मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा शेतकरी संघटनेचा इशारा**
KDM NEWS बार्शी (प्रतिनिधी) ११ ऑक्टोबर: अतिवृष्टी बाधितांना वाढीव नुकसान भरपाई द्यावी, पोटखराब, सामूहिक क्षेत्र अशा चुकीच्या त्रुटी काढून वगळलेले तसेच सन २०२३ आणि २०२४ मधील खरीप आणि रब्बी हंगामातील पिकविम्यापासून वंचित राहिलेल्या सर्व शेतकऱ्यांना पिकविमा मिळावा, या प्रमुख मागण्यांसाठी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष शंकर गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली पुणे येथील ओरिएंटल विमा कंपनीच्या वाकडेवाडी येथील राज्यस्तरीय कार्यालयात आणि कृषी आयुक्तालयाच्या कार्यालयात कालपासून (१० ऑक्टोबर) पुन्हा एकदा 'ठिय्या व मुक्काम आंदोलन' सुरू झाले आहे.
यापूर्वी, १ ऑक्टोबर रोजी याच ठिकाणी 'बोंबाबोंब आंदोलन' करण्यात आले होते. त्यावेळी दहा दिवसांत मागण्यांची पूर्तता करण्याचे आश्वासन प्रशासनाकडून मिळाले होते. अतिवृष्टीची वाढीव नुकसान भरपाई तसेच पोट खराब आणि सामूहिक क्षेत्राच्या नावाखाली वगळलेल्या शेतकऱ्यांना पिकविमा देण्याचे निर्णय झाले असले तरी, सन २०२३ व २०२४ च्या खरीप आणि रब्बीच्या पिकविम्यापासून महाराष्ट्रातील अनेक शेतकरी अजूनही वंचित असल्याच्या तक्रारी येत असल्याने पुन्हा आंदोलनाचा पवित्रा घेण्यात आला आहे.
यावेळी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना शंकर गायकवाड यांनी खणखणीत इशारा दिला आहे की, "मागण्यांची पूर्तता होत नाही तोपर्यंत या ठिकाणाहून हलणार नाही. यामध्ये पोलिसांनी अडथळा आणल्यास मंत्रालय, कृषीमंत्री किंवा मुख्यमंत्री यांचे कार्यालय व घरावर आंदोलन करणार."
या आंदोलनात शंकर गायकवाड यांच्यासह महादेव काशीद, दिलीप चव्हाण, शरद भालेकर, सुशांत गव्हाणे, दिलीप आगलावे, अविराज आगलावे, सुजित आगलावे, रविकांत पाटील, अक्षय उंबरे, वैजनाथ शिंदे, गंगाधर जाधव, दयानंद गंभीरे, दिगंबर शेळके, दत्तात्र्य अंबुरे, आनंद नलवडे, समाधान जाधव, हनुमंत जगताप, तानाजी माळी, ब्रह्मदेव अंबुरे, राहुल हंगरकर, मुकुंद जाधव, शरद कोंढारे, अनिकेत पाटील, समाधान पाटील, दशरथ भंडारे, विशाल शेळके, अमर शेळके, राहुल गोरे आदींसह बहुसंख्य शेतकरी सहभागी झाले आहेत.
वाकडेवाडी येथील विमा कंपनी कार्यालयात सुरू असलेल्या आंदोलनासाठी खडकी पोलीस स्टेशनच्या वतीने, तर आयुक्तालयात सुरू असलेल्या आंदोलनासाठी बंडगार्डन पोलीस स्टेशनच्या वतीने चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
KDM NEWS प्रतिनिधी
टिप्पण्या