**बार्शी तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्त रस्त्यांची युद्धपातळीवर दुरुस्ती पूर्ण"*
**बार्शी तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्त रस्त्यांची युद्धपातळीवर दुरुस्ती पूर्ण"**
**KDM NEWS प्रतिनिधी**बार्शी, दि. ७ : सोलापूर जिल्ह्यात सप्टेंबर महिन्यात झालेल्या मुसळधार पावसाने आणि पुराने शेती, घर आणि रस्त्यांचे मोठे नुकसान झाले. विशेषत: बार्शी तालुक्यात अनेक रस्ते, पुल आणि मार्ग वाहून गेल्याने गावांचा संपर्क तुटला होता. या पार्श्वभूमीवर पालकमंत्री जयकुमार गोरे आणि जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या निर्देशानुसार सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने दुरुस्ती सुरू केली. परिणामी, ६ ऑक्टोबरपर्यंत प्रमुख मार्गांची दुरुस्ती पूर्ण झाली असून, वाहतूक सुरळीत झाली आहे.
जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे बार्शी तालुक्यातील अनेक भागांत रस्ते, मोऱ्या आणि पुलांचे नुकसान झाले. काही ठिकाणी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती, ज्यामुळे नागरिक, विद्यार्थी, महिला आणि रुग्णांना त्रास सहन करावा लागला. पावसाचे प्रमाण कमी होताच सार्वजनिक बांधकाम मंडळाचे अधीक्षक अभियंता श्याम कुंभार आणि कार्यकारी अभियंता ए. बी. भोसले यांनी क्षतिग्रस्त भागांची पाहणी केली. त्यानुसार उपअभियंता विक्रांत चव्हाण, आकाश नलावडे आणि इतर कर्मचाऱ्यांनी युद्धपातळीवर काम सुरू केले.
प्रमुख जिल्हा मार्ग क्रमांक २९ वरील काटेगाव येथील नळकांडी पुल पूर्णपणे वाहून गेला होता. त्याठिकाणी नळकांड्या आणि मुरूम भरून रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. तसेच, इतर मार्गांवर मुरूम भरावा, पाण्याचा निचरा आणि तात्पुरती दुरुस्ती करून नागरिकांच्या सुरक्षित प्रवासाची व्यवस्था करण्यात आली. विभागाने तांत्रिक नियम आणि सुरक्षेचे पालन करून ही कामे वेगाने पूर्ण केली.
सप्टेंबरमध्ये बार्शी तालुक्यात ढगफुटीसारखा पाऊस पडल्याने शेतांमध्ये पाणी साचले आणि सीना नदीच्या पूराने अक्कलकोट, बार्शी आणि मोहोळ तालुक्यांत मोठा हाहाकार उडाला. जवळपास २ हजार नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले होते. आता दुरुस्ती पूर्ण झाल्याने स्थानिकांना दिलासा मिळाला आहे. विभागाचे अधिकारी सतत नजर ठेवून असून, पुढील पावसाळ्यात दीर्घकालीन उपाययोजना करण्याचे नियोजन आहे.
KDM NEWS प्रतिनिधी
टिप्पण्या