**महसूल मंत्र्याचा दुय्यम निबंधक कार्यालयावर छापा; अधिकाऱ्याच्या ड्रॉवरमधून पैसे सापडले, भ्रष्टाचाराच्या तक्रारींनंतर कारवाईचा धाक**
**महसूल मंत्र्याचा दुय्यम निबंधक कार्यालयावर छापा; अधिकाऱ्याच्या ड्रॉवरमधून पैसे सापडले, भ्रष्टाचाराच्या तक्रारींनंतर कारवाईचा धाक**
**KDM NEWS प्रतिनिधी**नागपूर, ६ ऑक्टोबर : सामान्य नागरिकांच्या रजिस्ट्री कामांसाठी पैसे मागितल्याच्या सततच्या तक्रारींनंतर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोमवारी दुपारी नागपूरच्या खामला (प्रतापनगर) येथील दुय्यम निबंधक कार्यालयात अचानक धाड टाकली. यावेळी सहाय्यक दुय्यम निबंधक अतुल कपले यांच्या टेबलच्या कुलुपबंद ड्रॉवरमधून मोठ्या प्रमाणात रोख रक्कम सापडली, ज्यामुळे कार्यालयात खळबळ उडाली. मंत्र्याच्या या झाडाझडतीत रजिस्ट्री प्रक्रियेत मोठ्या प्रमाणावर अनियमितता उघड झाल्या असून, पोलिस चौकशीचे आदेश दिले आहेत.
तक्रारींनुसार, शेतजमीन व घरखरेदीच्या रजिस्ट्रीसाठी प्रत्येक व्यवहारात ५ ते ८ हजार रुपये बेकायदेशीर आकारले जात होते. राज्य सरकारच्या ऑनलाइन प्रणाली असूनही एजंटांमार्फत रोख व्यवहार केले जात असल्याचेही समोर आले. याशिवाय, ३० लाखांपेक्षा जास्त मूल्याच्या व्यवहारांची माहिती आयकर विभागाला न देता नियम मोडले जात होते. बावनकुळे यांच्या छाप्यात ही रोख रक्कम वैयक्तिक आहे की रजिस्ट्रीशी संबंधित, याची पोलिस तात्काळ चौकशी करणार आहेत. चौकशीत दोषी आढळल्यास कठोर कारवाई होईल, असे मंत्र्यांनी स्पष्ट केले.
कार्यालयात धाड टाकताना बावनकुळे यांच्यासोबत वरिष्ठ अधिकारी व माध्यम प्रतिनिधी उपस्थित होते. पैशांचा शोध लागताच पोलिसांना बोलावले गेले. "भ्रष्टाचाराला मी कधीच थारा देणार नाही. महाराष्ट्रभरातील रजिस्ट्री कार्यालयांत अशीच कारवाई सुरू राहील," असे बावनकुळे म्हणाले. पूर्वी सावनेर व अमरावती येथील कार्यालयांवरही त्यांनी छापे टाकले होते. नागरिकांना आवाहन करताना ते म्हणाले, "रजिस्ट्रीसाठी एक रुपयाही देण्याची गरज नाही. पैसे मागितले तर माझ्या व्हॉट्सअॅप क्रमांक ९०४९४४०४० वर तक्रार करा. मी स्वतः कारवाई करेन."
या प्रकरणाने संपूर्ण महसूल विभागात धाक बसला असून, भ्रष्टाचाराच्या विरोधात मंत्र्यांची मोहीम तीव्र होण्याची शक्यता आहे. चौकशी अहवालानुसार पुढील कारवाईची घोषणा लवकरच होईल.
KDM NEWS प्रतिनिधी
टिप्पण्या