**पिसाळलेल्या लांडग्याचा शोध अद्याप सुरू; ग्रामस्थांना सावधगिरीचे आवाहन**

**पिसाळलेल्या लांडग्याचा शोध अद्याप सुरू; ग्रामस्थांना सावधगिरीचे आवाहन** 

**KDM NEWS प्रतिनिधी**बार्शी (सोलापूर), १५ ऑक्टोबर : तालुक्यातील रातंजन परिसरात १० आणि ११ ऑक्टोबर रोजी एका पिसाळलेल्या लांडग्याने ग्रामस्थांवर हल्ले करून दहशत पसरवली होती. या घटनेनंतर वन विभागाने तातडीने कारवाई करत परिसरात शोधमोहीम राबवली असून, अद्याप लांडग्याचा ठावठिकाणा लागलेला नाही. ग्रामस्थांना सावधगिरी बाळगण्याचे आणि कोणत्याही संशयास्पद प्राण्याशी संपर्क साधू नये, असे आवाहन वन विभागाने केले आहे.

घटनेच्या पार्श्वभूमीवर वन विभागाने जनजागृती अभियान राबवले. वन परिमंडळ अधिकारी धनंजय शिदोडकर यांनी सांगितले की, पिसाळलेला लांडगा काही दिवसांत नैसर्गिकरीत्या मृत होऊ शकतो; मात्र, त्याचा मृतदेह भटक्या कुत्र्यांसारख्या प्राण्यांनी खाल्ल्यास त्यांनाही संसर्ग होण्याचा धोका असतो. त्यामुळे असा लांडगा जिवंत किंवा मृत आढळल्यास हात न लावता तात्काळ वन विभागाला कळवावे.

१५ ऑक्टोबर रोजी पुणे येथील रेस्क्यू टीमचे नचिकेत अवधानी यांच्या मार्गदर्शनाखाली शोधमोहीम राबवण्यात आली. यात वनरक्षक सचिन पुरी (वैराग), बालाजी धुमाळ (पानगाव), परमेश्वर वाघमारे (चिंचोली), पोलीस पाटील मासाळ आणि जाधव यांच्यासह ग्रामस्थांचे सहकार्य लाभले. ड्रोनच्या साह्याने परिसराची बारकाईने तपासणी करण्यात आली; तरीही लांडगा सापडलेला नाही.

ही मोहीम उपवनसंरक्षक कुलराज सिंग (सोलापूर), सहाय्यक वनसंरक्षक अजित शिंदे आणि वनपरिक्षेत्र अधिकारी अलका करे यांच्या नेतृत्वाखाली चालवण्यात येत आहे. वन विभागाच्या तत्परतेमुळे ग्रामस्थांमध्ये दिलासा असून, परिसरात सतर्कता वाढवण्यात आली आहे. पिसाळण्याच्या संसर्गामुळे होणाऱ्या धोक्याबाबतही विभागाने माहिती दिली असून, वैद्यकीय मदत उपलब्ध आहे.

KDM NEWS प्रतिनिधी 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मुख्याध्यापकांची निर्दोष मुक्तता: बार्शी न्यायालयाचा निकाल

**बार्शी बाजार समितीत शेतकऱ्यांची लूट: वरद ट्रेडर्सच्या चोरीचा व्हिडिओ व्हायरल, ड्रायव्हरांना कमिशन देऊन माल आणण्याचा गोरखधंदा**

सोलापुरात लाचखोर तलाठ्याला रंगेहाथ पकडले; सहायक महसूल अधिकाऱ्यावरही गुन्हा दाखल