**पानगाव स्मशानभूमीत अज्ञातांकडून वृक्षतोडीची घटना; सीसीटीव्ही बसविण्याची मागणी**
**पानगाव स्मशानभूमीत अज्ञातांकडून वृक्षतोडीची घटना; सीसीटीव्ही बसविण्याची मागणी**
**KDM NEWS प्रतिनिधी**बार्शी (सोलापूर), दि. १५ ऑक्टोबर : बार्शी तालुक्यातील पानगाव गावाजवळील खंडोबा नगर वैकुंठ स्मशानभूमीत अज्ञात समाजकंटकांनी वृक्षतोडीची घटना घडली आहे. येथे लावलेल्या छोट्या-मोठ्या झाडांच्या फांद्या आणि मुख्य भाग तोडण्यात आले असून, लोकसहभागातून उभारलेल्या बोअरवेलच्या पाईपचेही नुकसान करण्यात आले. या घटनेमुळे परिसरातील पर्यावरणप्रेमी आणि नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.
रविवार सकाळी स्मशानभूमी परिसर स्वच्छता अभियान राबवण्यात आले. वृक्षप्रेमी आणि स्थानिकांनी एकत्र येऊन परिसर साफसूफ केला आणि निघून गेले. मात्र, दुपारच्या वेळी अज्ञात व्यक्तींनी १० ते १५ फूट उंचीच्या झाडांना मध्यभागातून कापून टाकले. यापूर्वीही या स्मशानभूमीत वारंवार नासधूस आणि तोडफोडीच्या घटना घडल्या आहेत, ज्यामुळे स्थानिकांना सतत त्रास सहन करावा लागतो.
लोकसहभागातून झाडांना पाणी देण्यासाठी उभारलेल्या बोअरवेलच्या पाईपवर दगड फेकून ते फोडण्यात आले आहे. परिणामी, वृक्षांना नियमित पाणी देण्यात अडचणी येत आहेत. या घटनांमुळे स्मशानभूमी परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची गरज असल्याचे मत सामाजिक कार्यकर्ते पिंटू नाईकवाडी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी व्यक्त केले आहे. "वारंवार होणाऱ्या या घटना रोखण्यासाठी तातडीने सीसीटीव्ही यंत्रणा उभारली पाहिजे," असे नाईकवाडी म्हणाले.
स्थानिक प्रशासनाने या प्रकरणाची दखल घेऊन दोषींवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. पोलिसांनी तपास सुरू केला असून, परिसरातील सुरक्षा वाढवण्यासाठी उपाययोजना करण्यात येत आहेत.
KDM NEWS प्रतिनिधी
टिप्पण्या