**मराठी भाषा विद्यापीठाला पूर्ण सहकार्य, गुणवत्तेची कास धरा : चंद्रकांत पाटील**
**मराठी भाषा विद्यापीठाला पूर्ण सहकार्य, गुणवत्तेची कास धरा : चंद्रकांत पाटील**
**KDM NEWS प्रतिनिधी**अमरावती, ६ ऑक्टोबर : मराठी भाषेला अडीच हजार वर्षांचा समृद्ध इतिहास आहे. त्यामुळे रिद्धपूर येथील मराठी भाषा विद्यापीठाने गुणवत्तापूर्ण शिक्षणावर भर द्यावा. यासाठी शासनाकडून सर्वतोपरी सहकार्य मिळेल, असे आश्वासन उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले. अभिजात मराठी भाषा सप्ताहानिमित्त संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात अभिजात दर्जा मिळालेल्या ११ भाषांच्या प्रतिनिधींच्या परिषदेचे उद्घाटन रविवारी झाले. ही परिषद ९ ऑक्टोबरपर्यंत चालणार आहे.
या वेळी अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मिलिंद बाराहाते, मराठी भाषा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. अविनाश आवलगावकर, विद्यापीठ अनुदान आयोगाचे सचिव डॉ. मनीष जोशी, मराठी भाषा विभागाचे सचिव किरण कुळकर्णी आणि सहसचिव अभय खांबोरकर उपस्थित होते. परिषदेत तमिळ, संस्कृत, कन्नड, तेलुगू, मल्याळम, ओडिया, मराठी, पाली, प्राकृत, आसामी आणि बंगाली या ११ अभिजात भाषांचे प्रतिनिधी सहभागी झाले आहेत.
पाटील म्हणाले, मराठीच्या संवर्धनासाठी संशोधन आवश्यक आहे. मराठी भाषा विद्यापीठाने तज्ज्ञ प्राध्यापक, आधुनिक अभ्यासक्रम आणि सुसज्ज ग्रंथालय उभारावे. शासनाने कर्मचारी भरती आणि बांधकामासाठी सर्व परवानग्या दिल्या आहेत. स्वातंत्र्यानंतर नोंदी कमी झाल्याने स्पष्ट आणि मुद्देसूद नोंदींसाठी परिषदेत मंथन व्हावे. ही परिषद मराठीच्या भविष्यातील वाटचालीसाठी ऐतिहासिक ठरेल.
जागतिक स्तरावर संशोधन, पेटंट आणि रॉयल्टीला महत्त्व आहे. भारताने स्टार्टअप्समध्ये अग्रस्थान मिळवले आहे. मातृभाषेत शिक्षणामुळे तांत्रिक विषय समजणे सोपे होते. गेल्या वर्षी ६७ टक्के तंत्रनिकेतन विद्यार्थ्यांनी मराठीतून परीक्षा दिल्या, परिणामी प्रवेशसंख्या दुप्पट झाली. मराठीला ३ ऑक्टोबर २०२४ रोजी अभिजात दर्जा मिळाला, ज्यामुळे संशोधन आणि शैक्षणिक निधीसाठी नव्या संधी खुल्या झाल्या.
कार्यक्रमाच्या प्रारंभी ग्रंथ दिंडी काढण्यात आली, ज्यात पाटील यांच्यासह मान्यवर सहभागी झाले. परिषदेत ‘भाषिनी’ यंत्रणेद्वारे ११ भाषांमध्ये तात्काळ भाषांतराची सुविधा आहे. यामुळे वक्त्यांचे सादरीकरण सर्वांना त्यांच्या मातृभाषेत समजते. ही पहिलीच वेळ आहे ज्यात इतक्या भाषांचे एकाच व्यासपीठावर भाषांतर होत आहे.
मराठी भाषा विभागाने सप्ताहानिमित्त मुंबई, नागपूर आणि अमरावतीत विविध कार्यक्रम आयोजित केले. ३ ऑक्टोबरला मुंबईत रवींद्र नाट्य मंदिरात उद्घाटन झाले, ज्यात ऑनलाइन मराठी आणि तंत्रज्ञानाच्या भूमिकेवर चर्चा झाली. परिषदेत भाषिक संशोधन, साहित्य संवर्धन आणि शिक्षणावर मंथन होणार आहे.
KDM NEWS प्रतिनिधी
टिप्पण्या