बाईपण भारी देवा’च्या चारूला ४१ व्या वर्षीच आला मेनोपॉज; मासिक पाळी लवकर बंद होण्याची कारणे काय?

 

बाईपण भारी देवा’च्या चारूला ४१ व्या वर्षीच आला मेनोपॉज; मासिक पाळी लवकर बंद होण्याची कारणे काय?

मेनोपॉज वयाच्या कोणत्या वर्षी येतो? मेनोपॉज लवकर येण्यामागील कारण काय? मेनोपॉजविषयी स्त्रियांमध्ये कोणते गैरसमज आहेत, याविषयी स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. निखिल दातार यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सविस्तर माहिती दिली.

मेनोपॉज म्हणजे स्त्रियांची मासिक पाळी कायमची बंद होणे. हा निसर्गचक्राचाच एक भाग आहे. प्रत्येक स्त्रीला आयुष्याच्या एका टप्प्यानंतर मेनोपॉजला सामोरे जावे लागते. नुकताच प्रकाशित झालेल्या बाईपण भारी देवा या चित्रपटातसुद्धा मेनोपॉजचा एक सीन दाखवण्यात आला आहे. या चित्रपटात दीपा परबने साकारलेली चारूची भूमिका प्रत्येकाच्या लक्षात असेल. एका सीनमध्ये दाखवले आहे की, चारूला वयाच्या ४१ व्या वर्षी मेनोपॉज येतो आणि कमी वयात मेनोपॉज आल्यामुळे ती अस्वस्थ होते. पण, तुम्हाला माहिती आहे का की, मेनोपॉज वयाच्या कोणत्या वर्षी येतो? मेनोपॉज लवकर येण्यामागील कारण काय? मेनोपॉजविषयी स्त्रियांमध्ये कोणते गैरसमज आहेत, याविषयी स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. निखिल दातार यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सविस्तर माहिती दिली.

डॉ. निखिल दातार सांगतात, “मेनोपॉजविषयी बऱ्याच महिलांमध्ये अनेक गैरसमज आहेत. अनेक महिला मासिक पाळी बंद होणं म्हणजे मेनोपॉज, असं समजतात. पण, मुळात मासिक पाळी बंद होण्यामागे अनेक कारणे आहेत आणि त्यातलं एक कारण मेनोपॉज हे आहे.”

मेनोपॉज केव्हा येतो?

डॉ. दातार पुढे सांगतात, “मेनोपॉज हा तेव्हा येतो, जेव्हा स्त्रीसंप्रेरकं तयार होणं बंद होते. स्त्रीसंप्रेरकं म्हणजे इस्ट्रोजेन, प्रोजेस्टेरॉन ही शरीरात उत्पन्न होणं जेव्हा बंद होते तेव्हा मेनोपॉज आला, असं म्हटलं जातं. ही हार्मोन्स जर बनली नाहीत, तर गर्भाशयावर त्याचा परिणाम होण्याचा प्रश्न येत नाही म्हणजेच स्त्रीला मासिक पाळी येत नाही.”

मेनोपॉज लवकर येण्यामागील कारणे

डॉ. दातार सांगतात, “मेनोपॉज आणि वयाचा संबंध आहे. हा निसर्गचक्राचाच एक भाग आहे. साधारणपणे वयाच्या ४५-५५ या दरम्यान मेनोपॉज येऊ शकतो; पण काही स्त्रियांना याआधीही मेनोपॉज येऊ शकतो. मेनोपॉज लवकर येण्यामागील कारणं वेगवेगळी असू शकतात.”
डॉ. दातार यांनी याबाबत अधिक स्पष्ट करताना सांगितले, “लाइफस्टाईलचा मेनोपॉजवर खोलवर परिणाम होतो. चुकीचा आहार, अपूर्ण झोप, सतत बसून काम करण्याची पद्धत, दिवसभर हालचाल न करणे, तणाव व ढासळलेलं मानसिक आरोग्य यांचा थेट परिणाम मेनोपॉजवर दिसून येतो. लवकर मेनोपॉज येण्याला अनेकदा आनुवंशिक कारणंसुद्धा जबाबदार असतात.

मुळात प्रत्येक स्त्री बाळ जेव्हा जन्माला येतं तेव्हा निसर्गानंच त्या बाळाच्या अंडाशयामध्ये स्त्रीबीजांचा साठा दिलेला असतो. जर मुळात हा साठा कमी असेल, तर तो लवकरच संपणार अणि पाळी थांबवणार. ज्यांच्या आयांची पाळी लवकर थांबली, त्या मुलींच्या बाबतीत असं होऊ शकतं. पूर्वी स्त्रियांना तिशीच्या आतच मुलं होऊन जात आणि त्यांचं एकंदर जीवनमान कमी वर्षांचं होतं. त्यामुळे हा प्रश्न इतका भेडसावणारा नव्हता. आता तसं होत नाही. महिला ताणतणावात असताना नियमित धूम्रपान करतात. त्या महिलांनासुद्धा मेनोपॉज लवकर येऊ शकतो.”

मेनोपॉज येण्याआधी स्त्रियांमध्ये काही लक्षणे दिसून येतात. त्याविषयी डॉ. दातार सांगतात, “स्त्रियांमध्ये मानसिक बदल दिसून येतो. हा मानसिक बदल हळूहळू जाणवतो. सुरुवातीला अनियमित मासिक पाळी येणं, अचानक घाम फुटणं, थकवा जाणवणं, वजन वाढणं, मेटाबॉलिजम कमी होणं, झोप न येणं, सतत मूड बदलत राहणं इत्यादी लक्षणं दिसून येतात.”

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मुख्याध्यापकांची निर्दोष मुक्तता: बार्शी न्यायालयाचा निकाल

**बार्शी बाजार समितीत शेतकऱ्यांची लूट: वरद ट्रेडर्सच्या चोरीचा व्हिडिओ व्हायरल, ड्रायव्हरांना कमिशन देऊन माल आणण्याचा गोरखधंदा**

सोलापुरात लाचखोर तलाठ्याला रंगेहाथ पकडले; सहायक महसूल अधिकाऱ्यावरही गुन्हा दाखल