दोन हेलिपॅड, 75 हजार खुर्च्या अन् 500 ट्रक; मोदींच्या सोलापूर दौऱ्याची जय्यत तयारी...
गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सोलापूर दौरा अखेर ठरला. पंतप्रधान मोदी हे येत्या 19 जानेवारी रोजी कुंभारी येथील रे नगरमधील घरकुलांचे लोकार्पण करण्यासाठी सोलापुरात येणार आहेत.मोदी यांची रे नगर येथे सभा होणार असून सभेला तब्बल एक लाख लोकांना आणण्याचे नियोजन आहे.कम्युनिस्ट पक्षाचे माजी आमदार नसय्या आडम यांच्या संकल्पनेतून विडी आणि इतर कामगारांसाठी सरकारच्या माध्यमातून सोलापूरमधील कुंभारीच्या रे नगर येथे घरकुले बांधण्यात आली आहेत. त्यातील सुमारे 15 हजार घरकुलांचे लोकार्पण पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते होणार आहे. त्यानिमित्त मोदी यांची रे नगर येथे जाहीर सभाही होणार आहे. या सभेला येणाऱ्या लोकांना बसण्यासाठी सुमारे 75 हजार खुर्च्या लागणार आहेत. तसेच, नागरिकांना सभास्थळी आणण्यासाठी 500 ट्रकची सोय करावी लागणार आहे, त्यासाठी जिल्हा प्रशासनाने सहकार्य करावे, असे आवाहनही माजी आमदार आडम यांनी केले आहे.जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद आणि जिल्हा (ग्रामीण) पोलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांनी मोदी यांच्या दौऱ्याच्या नियोजनाची बैठक घेतली. त्यात मोदी यांची सभा आणि घरकुलांच्या लोकार्पणासंबंधीच्या कार्यक्रमाचा आढावा घेण्यात आला. त्यात एक लाख लोकांना सभेसाठी आणण्याच्या नियोजनासंदर्भात चर्चा झाली.मोदी यांच्या सोलापूर दौऱ्यासाठी कुंभारी येथील रे नगरच्या शेजारी दोन हेलिपॅड उभारण्यात येणार आहेत. त्यामधील एक हेलिपॅड हे पंतप्रधान मोदी यांच्या हेलिकॉप्टरसाठी, तर दुसरे हेलिपॅड हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यासाठी असणार आहे.ग्रीन कॉरिडर'चेही भूमिपूजन
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या दौऱ्यात सुमारे सहा हजार कोटी रुपयांच्या खर्चाचा सुरत-चेन्नई ग्रीन कॉरिडर महामार्गाचे भूमिपूजनही करण्यात येणार आहे. तसेच, काही शाळांचेही भूमिपूजन मोदी करणार आहेत. ज्या रे नगरमध्ये विडी कामगारांसाठी घरकुले उभारण्यात आली आहेत, त्या रे नगरमध्ये 500 लोकांना प्रशिक्षण देणारे कौशल्य विकास केंद्र केंद्र आणि 40 अंगणवाड्याही उभारण्यात आल्या आहेत.
टिप्पण्या