बदलापूर जे घडलंय ते घृणास्पद आहेच, पण शाळेवर राग काढू नका, अध्यक्षांचा कंठ दाटून आला

बदलापूरच्या एका नामांकित शाळेतील सफाई कर्मचाऱ्याने दोन चिमुकल्या मुलींचे लैंगिक शोषण केल्याच्या घटनेमुळे सध्या बदलापूर शहरातील वातावरण अक्षरश: पेटले आहे. या घटनेत पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात अक्षम्य चालढकल केल्याने नागरिक आणि पालक कमालीचे संतापले आहेत.मंगळवारी सकाळी संतप्त नागरिकांनी हजारोंच्या संख्येने शाळेवर मोर्चा काढला. तर दुसरीकडे आंदोलकांचा जमाव बदलापूर रेल्वे स्थानकात ठिय्या मांडून बसला आहे. काहीवेळापूर्वीच बदलापूर स्थानकात आंदोलकांनी रेल्वे पोलिसांच्या पथकावर दगडफेक केली होती. तर दुसरीकडे शाळेबाहेरील आंदोलकांनी पोलीस सुरक्षेचे कडे भेदत शाळेच्या आतमध्ये शिरत तोडफोड केली. यावेळी आंदोलकांनी पेट्रोल ओतून शाळेचे वर्ग पेटवून देण्याचा प्रयत्नही केला. मात्र, पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे हा अनर्थ टळला. या प्रकारानंतर पहिल्यांदाच शाळेचे अध्यक्ष प्रसारमाध्यमांसमोर आले. मात्र, शाळेत घडलेल्या सगळ्या प्रकाराबाबत बोलताना शाळेचे अध्यक्ष भावूक झाल्याचे पाहायला मिळाले.

शाळेच्या अध्यक्षांनी आंदोलकांना शांत होण्याची विनंती केली. त्यांनी म्हटले की, गेल्या आठवड्यात शाळेत जी घटना घडली ती निंदनीय आणि घृणास्पद आहे. आम्ही पोलिसांना जास्तीत जास्त सहकार्य करत आहोत. प्रशासन आणि मुलीच्या पालकांनाही आम्ही सहकार्य करतोय. तसेच आमच्या शाळेतील यंत्रणा दुरुस्त आणि सुरक्षित कशा करता येतील, याचा विचार करत आहोत. माझी सगळ्यांना विनंती आहे की, तुम्ही कुठल्यातरी गोष्टीचा राग या शाळेवर काढू नका. तुम्ही पण याच शाळेत शिकला आहात, मी पण... हे वाक्य बोलताना शाळेच्या अध्यक्षांचा कंठ दाटून आला. यानंत त्यांना बोलता आले नाही आणि त्यांनी डोळ्याला रुमाल लावत तेथून काढता पाय घेतला.

पोलिसांकडून अश्रुधुराचा माराआज सकाळीच बदलापूर बंदची हाक देण्यात आली होती. तेव्हापासून नागरिकांचा मोठा जमाव शाळेबाहेर जमला होता. मात्र, याठिकाणी असलेल्या पोलिसांच्या एका पथकाने हा जमाव रोखून धरला होता. मात्र, काहीवेळापूर्वीच आंदोलकांच्या जमावापैकी काहीजण पोलिसांच्या सुरक्षेचे कडे भेदून आतमध्ये शिरले. या आंदोलकांनी शाळेत तोडफोड आणि नासधुस केली. या आंदोलकांनी सोबत पेट्रोल आणले होते, हे पेट्रोल ओतून शाळेत आग लावण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, पोलिसांनी हा प्रयत्न हाणून पाडला. या आक्रमक आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी शाळेच्या परिसरात अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. सध्या शाळेच्या परिसराला पोलीस छावणीचे स्वरुप प्राप्त झाले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मुख्याध्यापकांची निर्दोष मुक्तता: बार्शी न्यायालयाचा निकाल

**बार्शी बाजार समितीत शेतकऱ्यांची लूट: वरद ट्रेडर्सच्या चोरीचा व्हिडिओ व्हायरल, ड्रायव्हरांना कमिशन देऊन माल आणण्याचा गोरखधंदा**

सोलापुरात लाचखोर तलाठ्याला रंगेहाथ पकडले; सहायक महसूल अधिकाऱ्यावरही गुन्हा दाखल