**बनावट पोलिसांनी ज्येष्ठ दाम्पत्याला गंडवले: 72 हजारांचे सोने घेऊन पळाले**
**बनावट पोलिसांनी ज्येष्ठ दाम्पत्याला गंडवले: 72 हजारांचे सोने घेऊन पळाले**
**KDM NEWS प्रतिनिधी**बार्शी, 20 जून 2025* तालुक्यातील जामगाव बायपास रोडवरील स्वराज्य हॉटेलजवळ आज सकाळी 11:20 वाजता दोन अज्ञात इसमांनी ज्येष्ठ दाम्पत्याची फसवणूक करून 72 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लंपासले. बार्शी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून, तपास सुरू आहे.
शंकर जनार्धन कुलकर्णी (वय 70, माजी सैनिक, निवृत्त) आणि पत्नी विजया हे बार्शीतील सुभाष नगर, भिसे प्लॉट येथे राहतात. आज सकाळी 10:00 वाजता ते टीव्हीएस लुना मोटारसायकलवर यमाई देवीच्या दर्शनासाठी धानोरे येथे गेले. विजया यांनी दोन सोन्याच्या पाटल्या (3 तोळे, 60,000 रुपये) आणि एक अंगठी (4 ग्रॅम, 12,000 रुपये) घातली होती. दर्शनानंतर कुसळंब येथे पेट्रोल भरून ते जामगाव येथे पोहोचले. तिथे काळ्या मोटारसायकलवर आलेल्या दोन इसमांनी स्वत:ला पोलीस सांगून, “पुढे चेकिंग आहे, 5,000 रुपये दंड होईल, दागिने पिशवीत ठेवा,” असे खोटे सांगितले.
दुसऱ्या मोटारसायकलवरील दोन इसमांनाही असेच सांगून विश्वास बसवला. विजया यांनी दागिने पांढऱ्या कागदात ठेवले. अज्ञात इसमांनी हातचालाकीने कागद बदलून नकली बांगड्या ठेवल्या आणि पुडी देऊन पळाले. घरी पुडी उघडताच फसवणूक उघड झाली. कुलकर्णी दाम्पत्याने बार्शी पोलिसांत फिर्याद दिली.
पोलिसांनी अज्ञात दोन इसमांविरुद्ध गुन्हा नोंदवून हेड कॉन्स्टेबल अभय उंदरे यांच्याकडे तपास सोपवला आहे. सीसीटीव्ही आणि पुराव्यांच्या आधारे आरोपींचा शोध सुरू आहे. पोलिसांनी नागरिकांना बनावट अधिकाऱ्यांपासून सावध राहण्याचे आवाहन केले आहे. “अनोळखी व्यक्तींवर विश्वास ठेवू नका, तातडीने पोलिसांत संपर्क साधा,” असे पोलिसांनी सांगितले.
या फसवणुकीमुळे निवृत्तीवेतनावर अवलंबून असलेल्या दाम्पत्याला आर्थिक धक्का बसला आहे. तपासाला गती देण्यात आली असून, लवकरच आरोपी पकडले जातील, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला.