**बारावीच्या सराव परीक्षेत कमी गुण मिळाल्याने वडिलांच्या मारहाणीत मुलीचा मृत्यू**
**बारावीच्या सराव परीक्षेत कमी गुण मिळाल्याने वडिलांच्या मारहाणीत मुलीचा मृत्यू**
**KDM NEWS प्रतिनिधी**आटपाडी (सांगली): एका १७ वर्षीय मुलीचा तिच्या वडिलांच्या क्रूर मारहाणीमुळे मृत्यू झाल्याची हृदय पिळवटून टाकणारी घटना आटपाडी तालुक्यातील नेलकरंजी गावात घडली. बारावीच्या सराव परीक्षेत कमी गुण मिळाल्याने चिडलेल्या वडिलांनी मुलीला एवढी बेदम मारहाण केली की, तिचा मृत्यू झाला. मृत मुलीचे नाव साधना धोंडिराम भोसले असे आहे. या प्रकरणी साधनाचे वडील धोंडिराम भगवान भोसले यांना आटपाडी पोलिसांनी खुनाच्या आरोपाखाली अटक केली आहे.
**काय घडले नेमके?**
नेलकरंजी येथील माध्यमिक शाळेत शिक्षक असलेले धोंडिराम भोसले यांना साधना आणि एक मुलगा अशी दोन अपत्ये आहेत. त्यांची पत्नी प्रीती या गावच्या माजी सरपंच आहेत, तर धोंडिराम यांचे वडील भगवान भोसले हे त्याच शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष आणि पोलिस पाटील होते. साधना आटपाडी येथे बारावीचे शिक्षण घेत होती. दहावीच्या परीक्षेत तिला ९२.६० टक्के गुण मिळाले होते, आणि ती गावातील शाळेत प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाली होती. तिला डॉक्टर बनवण्याचे कुटुंबाचे स्वप्न होते. यासाठी ती वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी खासगी शिकवणी घेत होती.
नुकत्याच झालेल्या एका सराव परीक्षेत साधनाला अपेक्षेपेक्षा कमी गुण मिळाले. यामुळे शुक्रवारी (२० जून २०२५) रात्री धोंडिराम यांनी साधनाला जाब विचारला. "एवढा खर्च करतोय, तुझं कसं होणार? कशी डॉक्टर होणार?" असा आक्रमक पवित्रा त्यांनी घेतला. यावर साधनाने, "पप्पा, तुम्हालाही कमीच गुण मिळत होते. तुम्ही काय कलेक्टर झालात का? शिक्षकच झालात ना?" असे उलट उत्तर दिले. यामुळे संतापलेल्या धोंडिराम यांनी घरातील दगडी जात्याच्या लाकडी खुंट्याने साधनाला बेदम मारहाण केली. त्यांनी तिच्या पोटात लाथाही घातल्या. पत्नी प्रीती यांनी मध्यस्थीचा प्रयत्न केला, पण धोंडिराम थांबले नाहीत. तासाभराने पुन्हा त्यांनी साधनाला मारहाण केली. रात्री अनेकवेळा मारहाणीच्या या क्रूर कृत्यामुळे साधनाच्या डोक्याला आणि शरीराला गंभीर दुखापत झाली.
**मृत्यू आणि पोलिस कारवाई**
मारहाणीनंतर साधना अस्वस्थ अवस्थेत होती, पण शनिवारी (२१ जून २०२५) तिला रुग्णालयात नेण्यात आले नाही. धोंडिराम हे शाळेतील योग दिनाच्या कार्यक्रमासाठी गेले. घरी परतल्यानंतर साधना बेशुद्ध अवस्थेत आढळली. तातडीने तिला रुग्णालयात नेण्यात आले, पण डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. तिच्या डोक्याला आणि शरीरावर झालेल्या गंभीर जखमांमुळे तिचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले.
या घटनेने गावात आणि परिसरात खळबळ उडाली. साधनाची आई प्रीती यांनी आपल्या पतीविरुद्ध आटपाडी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी धोंडिराम भोसले यांना खुनाच्या आरोपाखाली अटक केली असून, पुढील तपास सुरू आहे.
**कुटुंबावर दुखाचा डोंगर**
साधनाच्या अकाली मृत्यूमुळे भोसले कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला आहे. गावातील प्रथम क्रमांकाची हुशार मुलगी आणि डॉक्टर बनण्याचे स्वप्न पाहणाऱ्या साधनाचा असा अंत होईल, याची कोणालाच कल्पना नव्हती. या घटनेमुळे परिसरात शिक्षणाच्या नावाखाली मुलांवर टाकल्या जाणाऱ्या दबावावर आणि पालकांच्या अतिरेकी अपेक्षांवर चर्चा सुरू झाली आहे.
पोलिसांनी या प्रकरणाचा तपास तीव्र केला असून, साधनाच्या मृत्यूच्या नेमक्या कारणांचा शोध घेण्यासाठी शवविच्छेदन अहवालाची प्रतीक्षा आहे. ही घटना समाजाला अंतर्मुख करणारी ठरली आहे.
KDM NEWS प्रतिनिधी