**विधी महाविद्यालय रस्त्यावरील खंडणी प्रकरणात दोन पोलीस कर्मचारी निलंबित**
**विधी महाविद्यालय रस्त्यावरील खंडणी प्रकरणात दोन पोलीस कर्मचारी निलंबित**
**KDM NEWS प्रतिनिधी**पुणे, दि. २२ जून २०२५: विधी महाविद्यालय रस्त्यावरील दामले पथ परिसरात मोटारीत मैत्रिणीसोबत गप्पा मारत थांबलेल्या तरुणाला धमकावून २० हजार रुपये उकळणाऱ्या डेक्कन पोलीस ठाण्यातील दोन कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले. गणेश तात्यासाहेब देसाई आणि योगेश नारायण सुतार अशी निलंबित कर्मचाऱ्यांची नावे आहेत. परिमंडळ एकचे प्रभारी पोलीस उपायुक्त निखील पिंगळे यांनी ही कारवाई केली.
मंगळवारी रात्री वारजे येथील एक तरुण आपल्या मैत्रिणीसोबत मोटारीत थांबला असताना, रात्रपाळीत गस्त घालणारे देसाई आणि सुतार तिथे पोहोचले. त्यांनी 'तुमच्याविरुद्ध तक्रार आहे' असे सांगून तरुणाला धमकावले आणि पोलीस ठाण्यात नेण्याची भीती दाखवत २० हजार रुपयांची मागणी केली. नंतर त्यांनी तरुणाला दुचाकीवर बसवून कमला नेहरू पार्कजवळील एटीएममध्ये नेले आणि पैसे उकळले.
घाबरलेल्या तरुणाने आणि त्याच्या मैत्रिणीने डेक्कन पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीषा निंबाळकर यांनी चौकशी करून अहवाल सादर केला. देसाई आणि सुतार यांनी वरिष्ठांना माहिती न देता कायदेशीर प्रक्रियेचे उल्लंघन केल्याने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई झाली. या कृतीमुळे पोलीस दलाची प्रतिमा मलीन झाल्याचे पिंगळे यांनी सांगितले.
यापूर्वी बोपदेव घाटातही असेच प्रकरण समोर आले होते, जिथे कोंढवा पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्याला अटक आणि निलंबन झाले होते. नागरिकांनी अशा गैरवर्तनाविरुद्ध तक्रार करावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
KDM NEWS प्रतिनिधी