**संत तुकाराम महाराज पालखीचे सोलापूर जिल्ह्यात स्वागत**
**संत तुकाराम महाराज पालखीचे सोलापूर जिल्ह्यात स्वागत**
**KDM NEWS प्रतिनिधी**अकलूज, दि. १ जुलै २०२५: संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याने आज पुणे जिल्ह्यातील सराटी येथून सोलापूर जिल्ह्यात प्रवेश केला. "विठ्ठल-विठ्ठल" आणि "तुकाराम-तुकाराम"च्या जयघोषात वारकरी भक्तीमय वातावरणात न्हाऊन निघाले. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी अकलूज येथे पादुकांचे पूजन करत पालखीचे स्वागत केले.
**अकलूज येथे गोल रिंगण**
पालखीने अकलूज येथील सदाशिवराव माने विद्यालयात विश्रांती घेतली. येथे भक्तीमय गोल रिंगण पार पडले. पताकाधारी, विणेकरी, टाळकरी आणि तुळशी वृंदावन घेतलेल्या महिलांनी वातावरण भक्तीमय केले. अकलूज नगरपरिषदेने गांधी चौकात स्वागत आयोजित केले.
**प्रशासनाचे हस्तांतरण**
पुणे जिल्हा प्रशासनाने नीरा नदीकाठी पादुकांना नीरास्नान घालून पालखी सोलापूर प्रशासनाकडे सुपूर्द केली. खासदार धैर्यशील मोहिते-पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी उपस्थित होते. प्रशासनाने पाणी, स्वच्छता आणि वैद्यकीय सुविधांचे नियोजन केले.
**पालखी मार्ग**
देहू येथून १८ जून रोजी निघालेल्या या ३४० व्या पालखी सोहळ्यात २७ दिंड्या पुढे आणि ३७० मागे आहेत. सोलापूर जिल्ह्यातील वेळापत्रक: १ जुलै - अकलूज, २ जुलै - बोरगाव श्रीपूर, ३ जुलै - पिराची करौली, ४ जुलै - वाखरी, ५ जुलै - पंढरपूर. आंथुर्णे मुक्काम यंदा रद्द आहे.
**वारकऱ्यांचा उत्साह**
लाखो वारकरी अभंग, टाळ-मृदंग आणि विठ्ठलनामाच्या गजरात सहभागी आहेत. प्रशासनाने वाहतूक, पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे आणि महिलांसाठी एसटी सवलतीची व्यवस्था केली आहे. पंढरपूरच्या विठ्ठल-रखुमाई दर्शनाची ओढ घेऊन वारी पुढे सरकत आहे.