**बार्शी तहसीलसमोर लाचखोरीचा सुळसुळाट : निराधार महिलांची आर्थिक लूट, प्रहार संघटनेचा कारवाईचा इशारा**

**बार्शी तहसीलसमोर लाचखोरीचा सुळसुळाट : निराधार महिलांची आर्थिक लूट, प्रहार संघटनेचा कारवाईचा इशारा** 

**KDM NEWS प्रतिनिधी**बार्शी, दि. ३१ जुलै २०२५ : बार्शी तहसील कार्यालयासमोर निराधार योजना, वृद्धापकाळ पेंशन आणि इतर कल्याणकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी येणाऱ्या महिलांची आर्थिक लूट होत असल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. तहसील कार्यालयाच्या परिसरात एजंटांचा सुळसुळाट वाढला असून, गरजू महिलांकडून अवैधरित्या पैसे उकळले जात आहेत. यावर प्रहार संघटनेच्या जिल्हाध्यक्षा संजीवनी बारंगुळे यांनी तीव्र संताप व्यक्त करत दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.

**एजंटांचा आर्थिक गैरव्यवहार**  
बार्शी तहसील कार्यालयासमोर दररोज निराधार, विधवा आणि वृद्ध महिलांची योजनांचा लाभ मिळवण्यासाठी गर्दी असते. मात्र, या महिलांना लाभ मिळवून देण्याच्या नावाखाली एजंटांकडून संगनमताने आर्थिक शोषण होत आहे. खांडवी (ता. बार्शी) येथील एका निराधार महिलेने दिलेल्या माहितीनुसार, एका एजंटाने अर्ज भरण्यासाठी ५०० रुपये घेतले. त्यानंतर अधिकाऱ्यांच्या सह्यांसाठी ३,००० रुपये मागितले. पैसे देण्यास नकार दिल्यावर त्या एजंटाने उद्धट वर्तन केल्याचा आरोप महिलेने केला आहे. अशा प्रकारच्या अनेक तक्रारी समोर येत असून, हा प्रकार वर्षानुवर्षे सुरू असल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे.

**प्रहार संघटनेचा आक्रमक पवित्रा**  
या घटनेची माहिती मिळताच प्रहार संघटनेच्या जिल्हाध्यक्ष संजीवनी बारंगुळे यांनी तहसील कार्यालयात धाव घेतली. त्यांनी या लुटीच्या प्रकाराचा तीव्र निषेध नोंदवला. "निराधार आणि वृद्ध महिलांना लुटणारी ही यंत्रणा लज्जास्पद आहे. योजनांचा लाभ मिळवण्यासाठी पैसे मागणे हा सरळ सरळ भ्रष्टाचार आहे. यात अधिकारीही सहभागी असल्याचे संकेत आहेत. मग या यंत्रणेवर नागरिकांचा विश्वास कसा राहील?" असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तसेच, दोषी एजंट आणि संबंधित अधिकाऱ्यांवर तातडीने कारवाई करावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

**नागरिकांमध्ये संताप, प्रशासनावर अविश्वास**  
निराधार योजना, वृद्धापकाळ पेंशन आणि इतर कल्याणकारी योजनांचा लाभ मिळवण्यासाठी तहसील कार्यालयात येणाऱ्या महिलांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. अर्ज भरण्यापासून ते मंजुरीपर्यंतच्या प्रत्येक टप्प्यावर एजंट पैसे उकळत असल्याच्या तक्रारी वाढत आहेत. काही प्रकरणांमध्ये अधिकाऱ्यांचेही या लुटीत संगनमत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. "वरिष्ठ अधिकारी याकडे का दुर्लक्ष करतात? ही लूट थांबवण्यासाठी कोणतीच ठोस कारवाई का होत नाही?" असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत. यामुळे प्रशासनावरील विश्वास उडत असल्याचे चित्र आहे.

**प्रशासनाची भूमिका काय?**  
या प्रकरणी तहसील कार्यालयातील अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता, त्यांनी याबाबत  तक्रारी अर्ज असल्यास कारवाई करणार असे सांगितले आहे. मात्र, स्थानिकांनी सांगितले की, अशा तक्रारी यापूर्वीही अनेकदा समोर आल्या आहेत, पण कारवाईचा अभाव आहे. प्रहार संघटनेने वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांना निवेदन देऊन तातडीने चौकशी आणि कारवाईची मागणी केली आहे.

**मागणी : कठोर कारवाई आणि पारदर्शकता**  
प्रहार संघटनेच्या संजीवनी बारंगुळे यांनी प्रशासनाला उद्देशून प्रश्न उपस्थित केले आहेत, "हा लाचखोरीचा सिलसिला असाच सुरू राहणार का? निराधार महिलांना लुटणाऱ्या एजंटांवर कारवाई होणार की हेच 'सिस्टम' मान्य केले जाणार?" त्यांनी योजनांच्या अंमलबजावणीत पारदर्शकता आणण्याची आणि दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच, योजनांचा लाभ गरजूंपर्यंत पोहोचावा यासाठी स्वतंत्र तक्रार निवारण यंत्रणा उभारण्याची सूचनाही त्यांनी केली आहे.

KDM NEWS प्रतिनिधी 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मुख्याध्यापकांची निर्दोष मुक्तता: बार्शी न्यायालयाचा निकाल

**बार्शी बाजार समितीत शेतकऱ्यांची लूट: वरद ट्रेडर्सच्या चोरीचा व्हिडिओ व्हायरल, ड्रायव्हरांना कमिशन देऊन माल आणण्याचा गोरखधंदा**

सोलापुरात लाचखोर तलाठ्याला रंगेहाथ पकडले; सहायक महसूल अधिकाऱ्यावरही गुन्हा दाखल