**पांगरीत हॉटेल मॅनेजरकडून शेतकऱ्याला मारहाण, धमकी; पोलिसांत तक्रार**
**पांगरीत हॉटेल मॅनेजरकडून शेतकऱ्याला मारहाण, धमकी; पोलिसांत तक्रार**
**KDM NEWS प्रतिनिधी**पांगरी, ता. बार्शी (सोलापूर), दि. ०४ जुलै २०२५: गावातील पाटील वाडा हॉटेलवर दारू पिऊन उलटी झाल्याच्या कारणावरून हॉटेल मॅनेजरने शेतकऱ्याला शिवीगाळ करत लोखंडी सळईने डोक्यात मारून जखमी केल्याची घटना २ जुलै २०२५ रोजी रात्री १०:३० वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी दुसऱ्या दिवशी सकाळी शेतकऱ्याने हॉटेल मॅनेजरला जाब विचारला असता, त्याने कोयत्याने धमकी दिल्याचा आरोप आहे. याबाबत पांगरी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
कारी (ता. बार्शी) येथील शेतकरी बालाजी खंडू खंडागळे (वय ४१) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, २ जुलै रोजी रात्री ते गावातील दादासाहेब विजय विधाते यांच्या पाटील वाडा हॉटेलवर गेले होते. तिथे उलटी झाल्याने हॉटेल मॅनेजर रवि मारुती माने (रा. कारी) याने त्यांना शिवीगाळ केली. खंडागळे यांनी जेवणाचे ताट टेबलवर ठेवताना भाजी सांडल्याने चिडलेल्या मानेने लोखंडी सळईने त्यांच्या डोक्याच्या डाव्या बाजूला कानाजवळ मारहाण केली. यावेळी शेजारील विजय यादव, परमेश्वर पकाले आणि किरण लोंढे यांनी भांडण सोडवले.
दुसऱ्या दिवशी (३ जुलै) सकाळी ८:३० वाजता खंडागळे यांनी मानेला मारहाणीचा जाब विचारला असता, त्याने कोयता घेऊन धमकी दिली आणि “तुला मारून टाकीन” असे म्हटले. यानंतर खंडागळे पांगरी पोलिस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेले. डोक्याला मार लागल्याने पोलिसांनी त्यांना प्रथम ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी पाठवले. उपचारानंतर खंडागळे यांनी पोलिस ठाण्यात परत येऊन रवि माने याच्याविरुद्ध तक्रार नोंदवली.
पांगरी पोलिस ठाण्यात रवि मारुती माने याच्याविरुद्ध मारहाण आणि धमकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तपास सुरू केला असून, अधिक माहिती घेतली जात आहे. खंडागळे यांच्या डोक्याला जखम झाल्याने वैद्यकीय अहवालाच्या आधारे पुढील कारवाई होणार आहे.
**पांगरी पोलिसांचे आवाहन**: अशा घटनांमध्ये नागरिकांनी संयम राखावा आणि कायदा हातात घेऊ नये, असे आवाहन पांगरी पोलिसांनी केले आहे. तक्रारीसाठी पोलिस ठाण्याशी संपर्क साधण्याचे सुचवले आहे.