**शासकीय कर्मचाऱ्यांसाठी सोशल मीडियाबाबत नवे नियम: महाराष्ट्र शासनाचा कडक शासन निर्णय**
**शासकीय कर्मचाऱ्यांसाठी सोशल मीडियाबाबत नवे नियम: महाराष्ट्र शासनाचा कडक शासन निर्णय**
**KDM NEWS प्रतिनिधी**मुंबई, दि. २८ जुलै २०२५: महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सोशल मीडिया वापरासंदर्भात नवीन मार्गदर्शक नियम जाहीर केले असून याबाबतचा शासन निर्णय आज जारी करण्यात आला. डिजीटल युगात सोशल मीडियाच्या वाढत्या प्रभावामुळे गोपनीय माहितीचा प्रसार, खोट्या बातम्या आणि शासकीय नियमांचे उल्लंघन टाळण्यासाठी हे नियम लागू करण्यात आले आहेत.
सामान्य प्रशासन विभागाच्या परिपत्रकानुसार, शासकीय कर्मचाऱ्यांनी सोशल मीडियावर शासकीय कार्यालये, कागदपत्रे, वाहने किंवा गोपनीय माहितीशी संबंधित रिल्स, पोस्ट्स किंवा कंटेंट प्रसिद्ध करू नये. तसेच, शासनाच्या धोरणांवर टीका करणे, राजकीय भाष्य करणे किंवा शासकीय प्रतिमेला धक्का पोहोचेल असे वर्तन टाळावे. महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम, १९७९ हे सोशल मीडियावरही लागू राहतील. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम, १९७९ अंतर्गत निलंबनासह कठोर कारवाई होईल.
या नियमावलीचा उद्देश शासकीय गोपनीयता आणि शिस्त राखणे हा आहे. कर्मचाऱ्यांनी सोशल मीडियाचा वैयक्तिक वापर जबाबदारीने करावा आणि शासकीय बाबींचा उल्लेख टाळावा, असे निर्देश आहेत. गोपनीयतेबाबत संशय असल्यास संबंधित विभागाकडून मार्गदर्शन घ्यावे. यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत अशा बेशिस्त वर्तनावर कारवाईचे संकेत दिले होते. गृह, माहिती-तंत्रज्ञान आणि विधि-न्याय विभागांच्या समन्वयाने ही तत्त्वे तयार झाली आहेत.
सर्व विभागांना या नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आदेश देण्यात आले असून, यामुळे शासकीय सेवेत शिस्त आणि पारदर्शकता वाढेल, असा विश्वास व्यक्त होत आहे.
KDM NEWS प्रतिनिधी
टिप्पण्या