**धाराशिव येथे हॉटेल व्यावसायिकावर हल्ला, सोन्याची चैन लुटली; सहा अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल**
**धाराशिव येथे हॉटेल व्यावसायिकावर हल्ला, सोन्याची चैन लुटली; सहा अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल**
**KDM NEWS प्रतिनिधी**धाराशिव, ३० जुलै २०२५**: धाराशिव येथील सिद्धेश्वर वडगांव रोडवरील हॉटेल भाग्यश्री येथे २३ जुलै २०२५ रोजी सायंकाळी ७ ते ७:३० वाजण्याच्या दरम्यान एका हॉटेल व्यावसायिकावर सहा अज्ञात व्यक्तींनी हल्ला करून त्यांच्या गळ्यातील ४०,००० रुपये किमतीची सोन्याची चैन लुटली. धाराशिव शहर पोलीस ठाण्यात याप्रकरणी भारतीय न्याय संहिता (BNS) 2023 च्या कलम ३(५), ३५१(२), ३५२, ११९(१), ११५(२), १०९ आणि शस्त्र अधिनियम १९५९ च्या कलम २५, ३ अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे.
फिर्यादी, हॉटेल भाग्यश्रीचे मालक, आपल्या कुटुंबासह वडगांव शिवारात राहतात. घटनेदिवशी ते हॉटेलच्या किचनजवळ पत्नी लैला यांच्याशी बोलत होते. हॉटेलमध्ये ८०-९० ग्राहकांची गर्दी होती. फोटो काढण्याच्या बहाण्याने फिर्यादींना हॉटेलसमोरील पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या पांढऱ्या रंगाच्या एर्टिगा गाडीजवळ बोलावण्यात आले. गाडीत सहा व्यक्ती होत्या. एका व्यक्तीने फिर्यादींचे हात पकडले, ड्रायव्हरने गाडीची काच बंद करून हात अडकवले आणि गाडी वेगाने धाराशिव रस्त्याकडे नेली. यावेळी एका हल्लेखोराने फिर्यादींच्या कपाळाला बंदूक लावली आणि “जामखेडपर्यंत फरफटत नेऊ, हात तुटतील तिथे टाकू किंवा घाटात मारू” अशी धमकी दिली. गाडीतील एकाने विरोध केल्याने सिद्धेश्वर वडगांव पुलाजवळ फिर्यादींना ढकलून देऊन त्यांची सोन्याची चैन हिसकावली.
हल्ल्यात फिर्यादींच्या डाव्या हाताच्या बोटांना आणि दोन्ही हातांना दुखापत झाली. त्यांचे जावई आकाश उर्कीडे आणि मुलगा संतोष यांनी त्यांना हॉटेलवर आणले. पोलिसांनी फिर्यादींना सिव्हील हॉस्पिटलमध्ये दाखल केले, तिथून त्यांनी पार्वती हॉस्पिटलमध्ये उपचार घेतले आणि २४ जुलै रोजी डिस्चार्ज मिळाला. २६ जुलै रोजी त्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली.
पोलिसांनी सहा अज्ञात व्यक्तींचा शोध सुरू केला असून, गाडीच्या तपशीलांचा तपास सुरू आहे. या घटनेमुळे स्थानिक व्यावसायिकांमध्ये भीती पसरली आहे. पोलिसांनी तातडीने कारवाईचे आश्वासन दिले आहे.
KDM NEWS प्रतिनिधी
टिप्पण्या