**बार्शी येथील महिलेची 9.48 लाखांची आर्थिक फसवणूक; पंढरपूरच्या कंत्राटदारावर गुन्हा दाखल**
**बार्शी येथील महिलेची 9.48 लाखांची आर्थिक फसवणूक; पंढरपूरच्या कंत्राटदारावर गुन्हा दाखल**
**KDM NEWS प्रतिनिधी**बार्शी, 28 ऑगस्ट 2025**: बार्शी येथील एका 28 वर्षीय महिलेने पंढरपूर येथील कंत्राटदाराविरुद्ध 9,48,238 रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचा आरोप करत पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. फिर्यादी अंजली किरण काकडे (वय 28, रा. गाडेगांव रोड, म्हाडा कॉलनी, बार्शी) यांनी पंढरपूर येथील तेजस दत्तात्रय पाटील यांच्यावर फसवणुकीचा आरोप केला आहे. तेजस यांनी रस्त्याच्या कामात भागीदारीचे आमिष दाखवून फिर्यादीकडून पैसे आणि लॅपटॉप घेतल्याचा दावा तक्रारीत करण्यात आला आहे.
अंजली यांनी पोलिसांना दिलेल्या जबाबात सांगितले की, त्या बी.टेकच्या शिक्षणासाठी बार्शी येथील भगवंत इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये शिकत असताना 20 जानेवारी 2021 रोजी जामगांव येथे सिमेंट रस्त्याचे काम सुरू होते. या कामाचे कंत्राट तेजस पाटील यांच्या पाटील कन्स्ट्रकशन कंपनीकडे होते. अंजली यांनी कामाचा अनुभव घेण्यासाठी तेजस यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी भागीदारीत काम करण्याची ऑफर दिली. तेजस यांनी 10 लाख रुपये गुंतवणुकीच्या बदल्यात 20 लाख रुपये परतावा देण्याचे आश्वासन दिले आणि थोडे-थोडे पैसे गुंतवण्याची सोय असल्याचे सांगितले.
या आमिषाला बळी पडून अंजली यांनी आपल्या पती, सासरे आणि सासूसोबत चर्चा करून पैसे गुंतवण्याचा निर्णय घेतला. त्यांनी 5 मार्च 2021 ते 31 डिसेंबर 2022 या कालावधीत फोनपेद्वारे 3,97,238 रुपये तेजस यांना दिले. याशिवाय, 20 डिसेंबर 2023 रोजी अंजली आणि त्यांचे पती यांनी पंढरपूर येथील एका हॉटेलमध्ये तेजस यांना 4,00,000 रुपये रोख दिले. तसेच, 5 जानेवारी 2024 रोजी बार्शी येथील भगवंत ग्राऊंड येथे 1,00,000 रुपये रोख स्वरूपात दिले. याव्यतिरिक्त, एप्रिल 2021 मध्ये तेजस यांनी ऑफिससाठी कॉम्प्युटरची गरज असल्याचे सांगितल्यावर अंजली यांनी 51,000 रुपये किमतीचा डेल कंपनीचा लॅपटॉप दिला.
मात्र, कामाचे बिल मिळाले नसल्याचे सांगत तेजस यांनी अंजली यांना वारंवार टाळाटाळ केली. त्यांनी बिल काढण्यासाठी अधिकाऱ्यांना पैसे द्यावे लागतील, असे सांगितले. काही काळानंतर तेजस यांनी अंजली यांचे फोन उचलणे बंद केले. दुसऱ्या नंबरवरून संपर्क साधल्यानंतर त्यांनी निवडणुकीमुळे बिल रखडल्याचे कारण सांगितले आणि वारंवार फोन न करण्यास सांगितले. मार्च 2025 मध्ये अंजली यांनी पंढरपूर येथे तेजस यांच्या ऑफिसची चौकशी केली असता, ऑफिस बंद झाल्याची माहिती मिळाली. तसेच, तेजस यांनी इतर अनेक लोकांचीही फसवणूक केल्याचे समजले. तेजस यांचे वडील दत्तात्रय पाटील यांनीही आपल्या मुलाने अनेकांकडून पैसे घेतल्याचे मान्य केले आणि पोलिसांत तक्रार करण्याचा सल्ला दिला.
अंजली यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, तेजस यांनी 20 जानेवारी 2021 ते 30 जून 2024 या कालावधीत एकूण 8,97,238 रुपये (3,97,238 रुपये ऑनलाइन आणि 5,00,000 रुपये रोख) आणि 51,000 रुपये किमतीचा लॅपटॉप, असे एकूण 9,48,238 रुपयांची फसवणूक केली. बार्शी पोलिसांनी तेजस दत्तात्रय पाटील (रा. गादेगांव, ता. पंढरपूर, जि. सोलापूर) यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
KDM NEWS प्रतिनिधी
टिप्पण्या