**सोलापूर जिल्ह्यात प्रथमच भटके विमुक्त दिवस साजरा; शिवरायांच्या स्वराज्यातील योगदानाचा गौरव**
**सोलापूर जिल्ह्यात प्रथमच भटके विमुक्त दिवस साजरा; शिवरायांच्या स्वराज्यातील योगदानाचा गौरव**
**KDM NEWS प्रतिनिधी**सोलापूर, ३१ ऑगस्ट :** छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य उभारताना भटके विमुक्त समाजाला सामावून घेतले. बहिर्जी नाईकांसारख्या व्यक्तींनी हेरगिरी आणि गडकिल्ल्यांच्या रक्षणात महत्त्वाची भूमिका बजावली. या समाजाच्या योगदानाचा उल्लेख करत राज्याचे ग्रामविकास व पंचायतराज मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी भटके विमुक्त दिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात सांगितले की, शासन या समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी कटिबद्ध आहे.
जिल्हाधिकारी कार्यालय, इतर मागास बहुजन विभाग आणि भटके विमुक्त विकास परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने नियोजन भवनात झालेल्या या कार्यक्रमात आमदार राजू खरे, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, शहर उपायुक्त विजय कबाडे, अतिरिक्त अधीक्षक प्रीतम यावलकर, राज्य भटके विमुक्त विकास परिषदेचे अध्यक्ष उद्धव काळे, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संतोष शिर्के, इतर मागास बहुजन विभागाचे सहाय्यक संचालक गणेश सोनटक्के यांच्यासह समाजातील शेकडो नागरिक उपस्थित होते.
पालकमंत्री गोरे म्हणाले, "१८७१ मध्ये ब्रिटिशांनी कायद्याने या समाजाला मुख्य प्रवाहापासून दूर ठेवले. स्वातंत्र्यानंतर ३१ ऑगस्ट १९५२ रोजी हा कायदा रद्द झाला. आता ग्रामविकास विभागातून बेघरांना घरकुले आणि जागाही मोफत दिली जात आहे." राज्य परिषदेचे अध्यक्ष काळे यांनी सांगितले की, इंग्रजांनी गुन्हेगारीचा ठपका ठेवला, पण स्वातंत्र्यानंतर योजना सुरू झाल्या. तरीही अनेकजण जात प्रमाणपत्र, आधार, मतदान कार्डापासून वंचित आहेत. शासनाने शिबिरे घेऊन ही प्रमाणपत्रे द्यावीत.
सोनटक्के यांनी प्रस्ताविकात म्हटले की, शासनाने ३१ ऑगस्टला भटके विमुक्त दिवस साजरा करण्याचा निर्णय घेतला असून, योजनांचे प्रबोधन केले जाईल. कार्यक्रमात राष्ट्रपुरुषांच्या प्रतिमापूजन आणि दीपप्रज्वलनाने सुरुवात झाली. पालकमंत्र्यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थी आणि नुकतेच शासकीय सेवेत निवडलेल्या उमेदवारांचा सत्कार झाला. तसेच जात प्रमाणपत्र, रेशन कार्ड आदींचे प्रातिनिधिक वाटप करण्यात आले. समाजातील नागरिकांनी पारंपरिक वाद्य आणि नृत्याने पालकमंत्र्यांचे स्वागत केले.
मागील वर्षात जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या मार्गदर्शनात प्रशासनाने २५ शिबिरांतून १६०९ मतदान ओळखपत्रे, १४२१ जात प्रमाणपत्रे, ५१७ आधार कार्ड, १९ दिव्यांग प्रमाणपत्रे, ९१४ आयुष्यमान भारत कार्ड वाटले. विशेष म्हणजे ६२ लाभार्थ्यांना घरकुलासाठी मोफत जमीन दिली. गोरे आणि काळे यांनी जिल्हा प्रशासनाचे कौतुक केले. सोलापूर हा भटके विमुक्त दिवस साजरा करणारा राज्यातील पहिला जिल्हा ठरला आहे.
KDM NEWS प्रतिनिधी
टिप्पण्या