**सोलापूर जिल्ह्यात अतिवृष्टीचा तडाखा; ग्रामीण भागातील शाळा-कॉलेजांना उद्या सुट्टी**
**सोलापूर जिल्ह्यात अतिवृष्टीचा तडाखा; ग्रामीण भागातील शाळा-कॉलेजांना उद्या सुट्टी**
**KDM NEWS प्रतिनिधी**सोलापूर, २३ सप्टेंबर :** भारतीय हवामान विभागाने दिलेल्या रेड अलर्टनुसार सोलापूर जिल्ह्यात अतिवृष्टी आणि पूरपरिस्थिती निर्माण झाल्याने जिल्हाधिकारी कुमार आशिर्वाद यांनी उद्या २४ सप्टेंबर रोजी ग्रामीण भागातील शाळा, महाविद्यालये आणि अंगणवाड्यांना सुट्टी जाहीर केली आहे. उत्तर सोलापूर (ग्रामीण), माढा, करमाळा, मोहोळ, बार्शी आणि दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रुप अपर तहसील कार्यालय क्षेत्रातील सर्व शैक्षणिक संस्था बंद राहणार आहेत.
जिल्ह्यात सिना कोळेगाव, चांदणी आणि खासापूरी धरणांतून अतिरिक्त पाणी सोडण्यात आल्याने सिना आणि भोगावती नद्यांना पूर आला आहे. यामुळे नदीकाठच्या गावांमध्ये पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली असून, जनजीवन विस्कळीत झाले आहे. हवामान विभागाने २२ सप्टेंबरला दिलेल्या पूर्वसूचनेनुसार जिल्ह्यात काही ठिकाणी अतिभारी ते अति-अतिभारी पावसाची शक्यता वर्तवली आहे. आज दिवसभर मुसळधार पावसाने जिल्ह्यातील अनेक भाग हादरले असून, शेती आणि रस्त्यांचे नुकसान झाले आहे.
आपत्ती व्यवस्थापन कायद्याच्या कलम २५ आणि शालेय शिक्षण विभागाच्या २०१९ च्या परिपत्रकानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी हा निर्णय घेतला. सुट्टीदरम्यान मुख्याध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी कार्यालयात हजर राहून स्थानिक प्रशासनाच्या आदेशानुसार आपत्ती व्यवस्थापनात सहकार्य करावे, असे आदेशात नमूद आहे.
शेजारच्या धाराशिव आणि बीड जिल्ह्यांतही अतिवृष्टीमुळे शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. प्रशासनाने नागरिकांना नदीकाठ आणि पूरग्रस्त भागात सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. हवामान विभागाने पुढील २४ तासांत पावसाची शक्यता वर्तवली असून, बचावकार्य वेगवान करण्यात येत आहे.
KDM NEWS प्रतिनिधी
टिप्पण्या