**सोलापूर जिल्ह्यात महापुराचा धोका; जिल्हाधिकाऱ्यांचे कडक आदेश: अधिकारी, कर्मचारी मुख्यालयातच थांबा!**
**सोलापूर जिल्ह्यात महापुराचा धोका; जिल्हाधिकाऱ्यांचे कडक आदेश: अधिकारी, कर्मचारी मुख्यालयातच थांबा!**
**KDM NEWS प्रतिनिधी**सोलापूर, दि. २६ सप्टेंबर २०२५**: सोलापूर, अहिल्यानगर आणि धाराशिव जिल्ह्यांत गेल्या आठवड्यापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने हाहाकार उडाला आहे. सिना कोळेगाव, चांदणी, खासापुरी धरणे आणि भोगावती नदीतून सध्या ५५,००० क्युसेकने पाण्याचा प्रचंड विसर्ग सुरू आहे. सिना आणि भीमा नद्यांना आलेल्या महापुरामुळे करमाळा, माढा, मोहोळ, पंढरपूर आणि उत्तर सोलापूर तालुक्यांतील वाकाव, केवड, उंदरगाव, दर्फाळसह १० गावांचा संपर्क तुटला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष कुमार आशीर्वाद (भा.प्र.से.) यांनी सर्व विभागप्रमुख, तालुका, क्षेत्रीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मुख्यालय न सोडण्याचे कडक आदेश दिले आहेत. आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ नुसार आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.
**शेतीचे प्रचंड नुकसान, वाहतूक ठप्प**
सिना नदीला गेल्या पाच दिवसांत दुसऱ्यांदा आलेल्या महापुरामुळे हजारो हेक्टर शेती पाण्याखाली गेली. केळी, पेरू, चिकू, द्राक्षे, डाळिंब, सोयाबीन, उडीद, मूंग, तूर, कांदा आणि मका ही तयार पिके उद्ध्वस्त झाली, तर कापूस पिकाचेही मोठे नुकसान झाले. मोहोळ तालुक्यातील १४ पैकी ५ बंधारे पाण्याखाली गेले. सोलापूर-विजापूर, सोलापूर-कोल्हापूर आणि सोलापूर-पुणे महामार्गांवर ४ ते ५ फूट पाणी साचल्याने वाहतूक पूर्णपणे ठप्प आहे. माढा-वैराग मार्गावरील सिना नदीवरील पूलही पाण्याखाली गेला. काही गावांत घरात पाणी शिरल्याने नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले. खत विक्रेत्यांचे सुमारे २५ लाखांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
**बचाव कार्याला गती**
जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी मोहोळ आणि करमाळा तालुक्यांतील पूरग्रस्त भागांची पाहणी केली. नुकसानाचे पंचनामे शुक्रवारपर्यंत पूर्ण करून शासनाकडे पाठवण्याचे निर्देश तहसीलदारांना दिले आहेत. बचाव कार्यासाठी ९ पथके कार्यरत असून, यात सोलापूरची ५, कोल्हापूरची २ आणि एनडीआरएफची २ पथके सामील आहेत. इंदापूर, नांदेड, लातूर, सांगली आणि कोल्हापूर येथून ११ नौका मागवण्यात आल्या आहेत. दारफळ गावात अडकलेल्या नागरिकांना हलवण्यासाठी लष्कराच्या हेलिकॉप्टरद्वारे हवाई वाहतूक केली जाणार आहे. अतिरिक्त एनडीआरएफ पथक लवकरच माढा तालुक्यात दाखल होणार आहे. २१ ते २३ सप्टेंबरदरम्यान १८५ जणांना सुरक्षितपणे वाचवण्यात यश आले आहे.
**आदेशाचे उल्लंघन खपवून घेतले जाणार नाही**
आपत्तीच्या काळात अधिकाऱ्यांची अनुपस्थिती मदत कार्यात अडथळा आणते, असे नमूद करून जिल्हाधिकाऱ्यांनी सर्वांना सतत संपर्कात राहण्याचे निर्देश दिले. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत कठोर कारवाई होईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे. शिवसेना नेत्यांनी धरण व्यवस्थापनातील चुकीमुळे पूर आल्याचा आरोप करत चौकशीची मागणी केली आहे.
**संपर्कासाठी नियंत्रण कक्ष**
नागरिकांना माहिती आणि मदतीसाठी जिल्हा नियंत्रण कक्ष (०२१७/२७३१०१२) वर संपर्क साधण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. या परिपत्रकाची प्रत आपत्ती व्यवस्थापन विभाग (मंत्रालय, मुंबई), विभागीय आयुक्त (पुणे), सोलापूर महापालिका आयुक्त, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, ग्रामीण पोलिस अधीक्षक आणि सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार यांना पाठवण्यात आली आहे.
KDM NEWS प्रतिनिधी
टिप्पण्या