**सोलापूर जिल्ह्यातील पूरग्रस्तांसाठी शासकीय मदतीचे निर्देश; पालकमंत्री जयकुमार गोरे यांचा आढावा**
**KDM NEWS प्रतिनिधी**सोलापूर, २९ सप्टेंबर : जिल्ह्यातील अतिवृष्टी आणि भीमा-सीना नद्यांना आलेल्या महापुरामुळे ६ तालुक्यांतील ९२ गावांना मोठा फटका बसला असून, शेती, घरं, जनावरं आणि सार्वजनिक सुविधांचे प्रचंड नुकसान झाले आहे. या बाधितांसाठी शासकीय मदत पोहोचवणे, गावांची स्वच्छता, रस्त्यांची दुरुस्ती आणि वीज-पाणी पुरवठा सुरळीत करणे ही जबाबदारी प्रशासकीय यंत्रणेची असल्याचे राज्याचे ग्रामविकास व पंचायतराज मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी स्पष्ट केले. एकही पूरग्रस्त मदतीपासून वंचित राहणार नाही, याची दक्षता घ्या, असे आवाहन त्यांनी केले.
शासकीय विश्रामगृहातील आढावा बैठकीत पालकमंत्री गोरे बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, महापालिका आयुक्त सचिन ओंबासे, पोलिस आयुक्त एम. राजकुमार, मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, अप्पर जिल्हाधिकारी मोनिका सिंह ठाकुर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर, निवासी उपजिल्हाधिकारी अभिजीत पाटील, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता श्याम कुंभार, जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता सकृत खांडेकर, जिल्हा उपनिबंधक किरण गायकवाड यांच्यासह संबंधित विभागप्रमुख उपस्थित होते.
पालकमंत्री गोरे म्हणाले, जिल्ह्यातील ११० महसुली मंडळांपैकी ७६ मंडळांत अतिवृष्टी झाली. ओला दुष्काळ लागू करण्याचे निकष कोणत्या मंडळांत पूर्ण होतात, याची सविस्तर माहिती प्रशासनाने गोळा करावी. पूरग्रस्तांना घरांच्या नुकसानीसाठी प्रत्येकी १० हजार रुपयांची मदत द्या. गावांची स्वच्छता करण्यासाठी एजन्सी नियुक्त करा, सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्यांची तात्पुरती दुरुस्ती त्वरित करावी. विविध संस्थांकडून येणारी मदत प्रत्येक गरजवंतापर्यंत पोहोचवण्यासाठी नियोजन करा. निवारा केंद्रातील नागरिकांना दोन वेळ जेवण आणि जनावरांना मुबलक चारा उपलब्ध करा.
जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी सांगितले की, जिल्ह्यात २५-२६ हजार जनावरांसाठी ३०० मेट्रिक टन मुरघास चारा बफर स्टॉक आहे. करमाळा, माढा, मोहोळ, उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर आणि अक्कलकोट तालुक्यांत चारा वाटप सुरू आहे. दररोज १००-१२० टन चाऱ्याची गरज असून, पुढील आठ दिवस पुरेल इतका चारा उपलब्ध आहे.
मुख्य कार्यकारी अधिकारी जंगम म्हणाले, बाधित गावांची स्वच्छता आणि नागरिकांची आरोग्य तपासणी सुरू आहे. प्रत्येक निवारा केंद्रात टँकरद्वारे पाणी पुरवठा आणि आरोग्य पथक तैनात आहे. जिल्हा परिषद अंतर्गत रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी किमान ४ कोटी रुपयांची गरज आहे.
जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष सरडे यांनी सांगितले की, पूरग्रस्तांना १० किलो गहू आणि १० किलो जवारी मोफत वाटप सुरू आहे. प्रत्येक कुटुंबाला ३ किलो तुरदाळ देण्याचे नियोजन असून, ८० हजार लिटर केरोसीनची मागणी शासनाकडे नोंदवली आहे.
अप्पर जिल्हाधिकारी ठाकुर म्हणाल्या, मदत कक्षाकडे नोंदवलेली मदत तहसीलदार आणि संस्थांमार्फत गरजवंतांपर्यंत पोहोचवली जात आहे.
वीज वितरण कंपनीचे अधीक्षक अभियंता सुनील माने म्हणाले, ९५ गावांत २४ कोटी रुपयांचे नुकसान झाले. करमाळा तालुक्यात अनेक गावांत वीज पुरवठा सुरळीत झाला असून, २७ गावांत पाणी ओसरल्यानंतर लगेच सुरू करू.
पालकमंत्री गोरे यांनी सर्व विभागांना निधी कमी पडल्यास जिल्हा नियोजन समितीतून उपलब्ध करू, असे आश्वासन दिले. जलसंपदा विभाग आणि प्रशासनाने पाण्याच्या विसर्गाबाबत समन्वय ठेवून पूर टाळावा, असे निर्देश दिले.
KDM NEWS प्रतिनिधी
टिप्पण्या