**मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सोलापूर जिल्ह्यातील पूरग्रस्त भागांची पाहणी**
**मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सोलापूर जिल्ह्यातील पूरग्रस्त भागांची पाहणी**
**KDM NEWS प्रतिनिधी**सोलापूर, २४ सप्टेंबर : जिल्ह्यात अतिवृष्टी आणि पुरामुळे झालेल्या प्रचंड नुकसानीची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज माढा तालुक्यातील निमगाव आणि दारफळ सीना या गावांना भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली. पूरग्रस्त नागरिकांशी संवाद साधताना त्यांनी राज्य सरकार पूर्णपणे त्यांच्या पाठीशी असून, शेती, जनावरे, घरे आणि व्यवसायातील नुकसानीसाठी सर्वतोपरी मदत दिली जाईल, अशी ग्वाही दिली.
मुख्यमंत्री म्हणाले, "संकटकाळात धीर धरा. सरकार तुमच्यासोबत आहे. नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाल्यानंतर शेतकऱ्यांना पीक नुकसानीसाठी, घरांच्या दुरुस्तीसाठी आणि अन्नधान्यासाठी मदत मिळेल. व्यावसायिकांसाठीही स्वतंत्र पॅकेज जाहीर केले जाईल." त्यांनी नुकत्याच मंत्रिमंडळ बैठकीत पूरग्रस्तांसाठी २ हजार कोटी रुपयांचा तातडीचा निधी मंजूर झाल्याचे सांगितले. ओल्या दुष्काळाच्या निकषांप्रमाणे ही मदत वितरित केली जाईल, असेही ते म्हणाले.
दारफळ गावात नदीने पात्र बदलल्याने मोठा भाग पाण्यात बुडाला. घरांमध्ये पाणी शिरून अन्नधान्य, शेती आणि जनावरांचे मोठे नुकसान झाले. निमगावातही शेतरस्ते, शाळा आणि वीज व्यवस्थेची हानी झाली. मुख्यमंत्री म्हणाले, "रस्ते, शाळा आणि वीज सुविधांच्या दुरुस्तीसाठीही निधी उपलब्ध करू."
या भेटीदरम्यान पालकमंत्री जयकुमार गोरे, खासदार धैर्यशील मोहिते पाटील, आमदार रणजीत मोहिते पाटील, आमदार अभिजीत पाटील, विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हाधिकारी कुमार आशिर्वाद, जिल्हा परिषद सीईओ कुलदीप जंगम आणि पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी उपस्थित होते. माजी खासदार रणजितसिंह निंबाळकर आणि माजी आमदार राम सातपुतेही हजर होते.
मुख्यमंत्र्यांनी नागरिकांच्या व्यथा ऐकल्या आणि संकटातून बाहेर पडण्यासाठी सरकारची पूर्ण मदत मिळेल, असे आश्वासन दिले. जिल्ह्यातील नुकसानाचे मूल्यमापन सुरू असून, लवकरच मदत वितरण सुरू होईल.
KDM NEWS प्रतिनिधी
टिप्पण्या