**बार्शीपुत्र आयएएस रमेश घोलप यांच्याकडून अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना तीन महिन्यांच्या पगारातून ५ लाखांची मदत**

**बार्शीपुत्र आयएएस रमेश घोलप यांच्याकडून अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना तीन महिन्यांच्या पगारातून ५ लाखांची मदत** 
**KDM NEWS प्रतिनिधी**सोलापूर, २९ सप्टेंबर : महाराष्ट्रातील अतिवृष्टी आणि महापुरामुळे प्रभावित शेतकऱ्यांच्या मदतीसाठी झारखंडमध्ये कार्यरत असलेले आयएएस अधिकारी रमेश घोलप यांनी वैयक्तिक स्तरावर मोठा पुढाकार घेतला. सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील महागावचे रहिवासी असलेल्या घोलप यांनी आपल्या तीन महिन्यांच्या पगारातून एकूण ५ लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली. यातील पहिल्या टप्प्यात आत्महत्याग्रस्त दोन शेतकरी कुटुंबांना प्रत्येकी १ लाख रुपयांचे धनादेश सुपूर्द करण्यात आले, तर उर्वरित ३० शेतकऱ्यांना प्रत्येकी १० हजार रुपयांची मदत दिवाळीपर्यंत वितरित केली जाईल.

गेल्या काही आठवड्यांपासून महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे, घरांचे आणि जनावरांचे प्रचंड नुकसान झाले आहे. अनेक शेतकरी आर्थिक संकटात सापडले असून, काहींनी टोकाचा निर्णय घेतला. या पार्श्वभूमीवर घोलप यांनी सामाजिक जबाबदारी आणि कर्तव्यभावनेतून ही मदत जाहीर केली. रविवारी त्यांनी पत्नी रुपाली घोलप यांच्यासह बार्शी तालुक्यातील कारी आणि दहीटणे गावांना भेट देऊन मदत वाटप केले.

कारी गावातील दिवंगत शेतकरी गंभीरे यांच्या कन्या दुर्गा हिने वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी पोलिस सेवेत जाण्याचा निर्धार केला आहे. घोलप यांनी दुर्गाशी चर्चा करून तिला भविष्यातील अडचणींसाठी स्वतःचा आणि पत्नीचा मोबाइल नंबर दिला. ही १ लाख रुपयांची मदत दुर्गाच्या नावावर फिक्स डिपॉझिट स्वरूपात जमा करण्याचा सल्ला देऊन, अभ्यासकाळात आर्थिक अडथळे येऊ नयेत याची काळजी घेण्यात आली.

दहीटणे गावातील दिवंगत शेतकरी लक्ष्मण गवसाने यांच्या कुटुंबाला मुलगा-मुलींच्या शिक्षणासाठी १ लाख रुपयांची मदत देण्यात आली. घोलप म्हणाले, "मृत व्यक्तीची उणीव भरता येत नाही, पण समाजातील प्रत्येकाने आपल्या परीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसोबत उभे राहिले पाहिजे. आर्थिक मदतीसोबत भावनिक आधारही महत्त्वाचा आहे." त्यांनी समाजातील विविध घटकांना शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहण्याचे आवाहन केले.

घोलप हे गरीब कुटुंबातून शिक्षण घेऊन आयएएस झालेले अधिकारी आहेत. सध्या ते झारखंडच्या पेयजल आणि स्वच्छता विभागाचे विशेष सचिव तसेच जल जीवन मिशनचे मिशन डायरेक्टर म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या लोकाभिमुख कार्यपद्धतीमुळे झारखंडमध्ये 'गरीबांचा कलेक्टर' म्हणून ओळख आहे. या निर्णयाने शेतकरी वर्गातून त्यांचे कौतुक होत असून, सामाजिक बांधिलकीचे उदाहरण म्हणून पाहिले जात आहे.

KDM NEWS प्रतिनिधी 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मुख्याध्यापकांची निर्दोष मुक्तता: बार्शी न्यायालयाचा निकाल

**बार्शी बाजार समितीत शेतकऱ्यांची लूट: वरद ट्रेडर्सच्या चोरीचा व्हिडिओ व्हायरल, ड्रायव्हरांना कमिशन देऊन माल आणण्याचा गोरखधंदा**

सोलापुरात लाचखोर तलाठ्याला रंगेहाथ पकडले; सहायक महसूल अधिकाऱ्यावरही गुन्हा दाखल