**सोलापूर-तुळजापूर मार्गावर चार दिवस वाहतूक बंद; कोजागिरी-मंदिर पौर्णिमेला भाविकांसाठी विशेष व्यवस्था**
**सोलापूर-तुळजापूर मार्गावर चार दिवस वाहतूक बंद; कोजागिरी-मंदिर पौर्णिमेला भाविकांसाठी विशेष व्यवस्था**
**KDM NEWS सोलापूर, ३० सप्टेंबर २०२५**: कोजागिरी पौर्णिमा (६ ऑक्टोबर) आणि मंदिर पौर्णिमा (७ ऑक्टोबर) निमित्त श्री तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी सोलापूरहून तुळजापूरला पायी जाणाऱ्या लाखो भाविकांच्या सुरक्षेसाठी सोलापूर शहर पोलीस आयुक्त एम. राजकुमार यांनी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५२ वरील जूना तुळजापूर नाका ते तुळजापूर मार्गावर ४ ऑक्टोबर पहाटे ००.०१ पासून ७ ऑक्टोबर रात्री २४.०० पर्यंत सर्व वाहनांना बंदी घातली आहे.
महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ च्या कलम ३३ अंतर्गत जारी या आदेशानुसार, भाविकांना अडथळा, अपघात आणि कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. फक्त पोलीस वाहने, रुग्णवाहिका, अग्निशमन वाहने आणि पोलीस परवानगी असलेली वाहने यांना सूट आहे. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांना कलम १३५ अंतर्गत शिक्षा होईल.
**बंद मार्ग**: सोलापूर शहरातील जूना तुळजापूर नाका ते तुळजापूर (राष्ट्रीय महामार्ग ५२).
**पर्यायी मार्ग**:
- पुणे महामार्गावरून छत्रपती संभाजीनगर: सोलापूर (बाळे गाव)-बार्शी-येरमाळा.
- पुणे महामार्गावरून धाराशिव: सोलापूर (बाळे गाव)-बार्शी-वैराग.
- पुणे महामार्गावरून लातूर: सोलापूर (बाळे गाव)-बार्शी-येडशी-ढोकी-मुरूड.
- सोलापूर/पुणे मार्गावरून तुळजापूर: हैदराबाद महामार्गावरील मार्केट यार्ड-बोरामणी-इटकळ-मंगरूळ पाटी मार्गे लातूर.
पोलीस आयुक्तांनी भाविक आणि वाहनचालकांना सहकार्याचे आवाहन केले आहे. यंदा नवरात्रोत्सवात भाविकांची संख्या वाढण्याची शक्यता असल्याने गतवर्षीपेक्षा कडक उपाय लागू करण्यात आले आहेत.
KDM NEWS प्रतिनिधी
टिप्पण्या