**पीसीपीएनडीटी कायद्याची कठोर अंमलबजावणी करून लिंग गुणोत्तर सुधारणार : आरोग्यमंत्री आबिटकर**
**पीसीपीएनडीटी कायद्याची कठोर अंमलबजावणी करून लिंग गुणोत्तर सुधारणार : आरोग्यमंत्री आबिटकर**
**KDM NEWS प्रतिनिधी**मुंबई, दि. २३ सप्टेंबर २०२५ : राज्यातील स्त्री-पुरुष लिंग गुणोत्तर वाढविण्यासाठी आणि स्त्री भ्रूणहत्या रोखण्यासाठी गर्भधारणापूर्व व प्रसूतीपूर्व निदान तंत्रे (पीसीपीएनडीटी) कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिले. येत्या एका महिन्यात जिल्हानिहाय पर्यवेक्षकीय समित्या स्थापन करून नियमित कार्यशाळा घेण्याचेही त्यांनी सांगितले.
प्रकाश आबिटकर यांच्या अध्यक्षतेखाली पीसीपीएनडीटी कायद्याच्या अंमलबजावणीसाठी राज्यस्तरीय पर्यवेक्षकीय मंडळाची आढावा बैठक झाली. या बैठकीत नागरी नोंदणी प्रणालीवर आधारित जिल्हानिहाय जन्म लिंग गुणोत्तराची पडताळणी करण्यात आली. आरोग्य विभागाने कायद्यांतर्गत केलेल्या कारवाया आणि जनजागृती मोहिमांचा आढावा घेतला. आबिटकर म्हणाले, मुलींच्या संख्येत वाढ आणि लिंग गुणोत्तर सुधारण्यासाठी गंभीर प्रयत्न आवश्यक आहेत. सोशल मीडियाद्वारे युवकांमध्ये जागृती, आशा कार्यकर्त्या व ग्रामस्थ समितींचा सहभाग, स्वयंसेवी पथकांची उभारणी (स्पष्ट स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसीजरसह), शालेय-महाविद्यालयीन स्तरावर समुपदेशन सत्रे आणि स्थानिक प्रतिनिधींचा सक्रिय सहभाग यावर भर द्यावा.
बैठकीत स्त्री भ्रूणहत्या सारख्या गुन्ह्यांवर अंकुश ठेवण्यासाठी सामाजिक जागृती मोहिमांना गती देण्यावर चर्चा झाली. ग्रामीण भागात आशा कार्यकर्त्यांद्वारे सामूहिक जबाबदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले. कायद्याची कठोर अंमलबजावणी करून सकारात्मक मानसिकता निर्माण करण्यासाठी स्थानिक नेत्यांचा सहभाग वाढवावा, असे आबिटकर यांनी नमूद केले.
दूरदृश्य प्रणालीद्वारे आमदार मंजुळा गावित, आमदार सुलभा खोडके, आरोग्य सेवा आयुक्त व राष्ट्रीय आरोग्य अभियान संचालक डॉ. कादंबरी बलकवडे, आरोग्य सेवा संचालक डॉ. विजय कंदेवाड, अतिरिक्त संचालक डॉ. संदीप सांगळे, डॉ. भूपेश सामंत, डॉ. प्रसाद मगर, महिला आयोग सदस्य सचिव नंदिनी अवाडे, विधी तज्ज्ञ, अशासकीय संघटनांच्या महिला कार्यकर्त्या डॉ. किरण मोघे, डॉ. सुधा कांकरिया, समाजशास्त्रज्ञ डॉ. निशिगंधा वाड, स्त्रीरोग व प्रसूतीतज्ज्ञ डॉ. गीता पिल्लई, डॉ. शोभा मोसेस, बालरोगतज्ज्ञ डॉ. अमोल मानिक पवार, रेडिओलॉजिस्ट डॉ. अजय जाधव, डॉ. राजेंद्र रामेश्वर कलंत्री, वैद्यकीय शिक्षण विभाग व महिला व बाल विकास विभागाचे प्रतिनिधी उपस्थित होते.
आरोग्य विभागाने कायद्यांतर्गत चालू कारवाया आणि जनजागृती उपक्रमांची माहिती सादर केली. या बैठकीमुळे कायद्याच्या अंमलबजावणीसाठी नवीन गती मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
KDM NEWS प्रतिनिधी
टिप्पण्या