**बार्शीतील पारलिंगी समुदायाची शेतकऱ्यांसाठी हातभार; जोगव्याच्या रकमेतून आर्थिक मदत**
**बार्शीतील पारलिंगी समुदायाची शेतकऱ्यांसाठी हातभार; जोगव्याच्या रकमेतून आर्थिक मदत**
**KDM NEWS प्रतिनिधी** बार्शी ;दि. २५ (सोलापूर) - सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यात सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टी आणि पुरामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. १०, १३, १४ आणि १७ सप्टेंबर रोजी पडलेल्या मुसळधार पावसाने पांगरी, नारी, गौडगाव, वैराग, पानगाव, खांडवी, आगळगाव, सौंदरे आदी भागातील पिके उद्ध्वस्त झाली. शेती, जनावरे आणि घरांचे नुकसान झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. या पार्श्वभूमीवर बार्शी शहर आणि तालुक्यातील पारलिंगी (तृतीयपंथी) समुदायाने पुढाकार घेत जोगवा मागून गोळा केलेली रक्कम नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी दान केली आहे.
गुरुवारी तहसील कार्यालयात जाऊन ही रोख रक्कम निवासी नायब तहसीलदार संजीवन मुंढे यांच्याकडे मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी सुपूर्द करण्यात आली. पारलिंगी मार्गदर्शक सचिन वायकुळे यांच्या नेतृत्वाखाली हा उपक्रम राबवण्यात आला. समुदायातील सदस्यांनी टाळ्या वाजवून दहा-वीस रुपयांच्या स्वरूपात जमा केलेली ही रक्कम असली तरी ती शेतकऱ्यांच्या मनोबलासाठी प्रेरणादायी ठरली आहे. तालुक्यात अशी मदत करणारा हा पहिला समुदाय असल्याचे सांगितले जात आहे.
समाजाने आम्हाला नेहमीच आधार दिला आहे. आज शेतकरी संकटात असताना त्यांच्या पाठीशी उभे राहणे हे आमचे कर्तव्य आहे, अशी भावना पारलिंगी सदस्यांनी व्यक्त केली. रक्कम मोठी नसली तरी शेतकऱ्यांना या कठीण काळातून बाहेर पडण्यासाठी बळ मिळावे, हाच आमचा उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्ह्यात सीना नदीच्या पुरामुळेही मोठे नुकसान झाले असून, राज्य सरकारने अतिवृष्टीग्रस्तांसाठी २१५ कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे. मात्र, या मदतीच्या वाटपासाठी पंचनामे सुरू आहेत.
KDM NEWS प्रतिनिधी
टिप्पण्या