**बार्शीतील शिवशक्ती अर्बन को-ऑप बँकेत कोट्यवधींचा घोटाळा; चेअरमन, सह-सरव्यवस्थापकांवर संगनमताचे आरोप**

**बार्शीतील शिवशक्ती अर्बन को-ऑप बँकेत कोट्यवधींचा घोटाळा; चेअरमन, सह-सरव्यवस्थापकांवर संगनमताचे आरोप** 
**KDM NEWS प्रतिनिधी**बार्शी, २८ सप्टेंबर २०२५ ** बार्शीतील शिवशक्ती अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडमध्ये कोट्यवधी रुपयांच्या आर्थिक गैरव्यवहारांचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. बँकेच्या २५ व्या सर्वसाधारण सभेनंतर नेमलेल्या चौकशी समितीच्या अहवालात चेअरमन प्रकाश बुरगुटे, सह-सरव्यवस्थापक गणेश बारंगुळे आणि युवराज बारंगुळे या तिघांनी बँकेच्या निधीचा वैयक्तिक प्लॉटिंग व्यवसायासाठी गैरवापर केल्याचे उघड झाले आहे. समितीचे सदस्य नंदकुमार जगदाळे यांनी हा अहवाल सभेसमोर सादर केला असून, त्यात २६ कोटी रुपयांच्या नियमबाह्य कर्जवाटपाचे तपशील आहेत.

अहवालानुसार, गट क्रमांक १०००/२ या जागेवर ३५ जणांना १२ कोटी रुपयांचे गृहकर्ज देऊन प्लॉट विक्री करण्यात आली. यापैकी १३ फाइल्स बंद करण्यात आल्या, परंतु त्या इतर कर्जात रूपांतरित झाल्या. उर्वरित २२ पैकी १५ जणांची ६ कोटी रुपयांची कर्जे अद्याप फेडलेली नाहीत. अमर थोरबोले या व्यक्तीच्या तक्रारीवर पोलिस जबाबात बुरगुटे, बारंगुळे आणि युवराज यांनी भागीदारीत प्लॉटिंग व्यवसाय केल्याचे कबूल केले आहे. तडजोडीचा पुरावा बँक स्टेटमेंटमध्ये असून, हे तिघे बँकेच्या पैशाचा वैयक्तिक लाभासाठी वापर करत असल्याचे स्पष्ट होते.

बँकेत हॉटेल सॅन्ट्रो, न्यू सॅन्ट्रो, त्रुनु, न्यू ऋतु, वैशाली यांसारख्या हॉटेलांना नियमबाह्य कर्ज देण्यात आले. हे हॉटेल प्रत्यक्षात बुरगुटे आणि बारंगुळे यांच्या मालकीचे असून, नावे इतरांच्या आहेत. उदाहरणार्थ, हॉटेल सॅन्ट्रोला १.४ कोटी कर्ज, न्यू सॅन्ट्रोला १.४ कोटी, वैशालीला ०.४ कोटी अशी कर्जे देण्यात आली. या खात्यांतून रोख काढणे, एकमेकांना ट्रान्सफर करणे असे शंकास्पद व्यवहार झाले. रामगुडे ब्रदर्स, आगलावे ग्रुप, बारंगुळे ग्रुप यांसारख्या बनावट खात्यांतून पैसे प्लॉटिंग आणि सावकारीसाठी वापरले गेले.

बँकेच्या सिटी ब्रांचची जागा प्रकाश बुरगुटे यांच्या नावावर खरेदी करण्यासाठी बँकेचा अॅडव्हान्स आणि कर्मचाऱ्यांच्या नावे कर्ज वापरले. ऑडिटरच्या सूचनेनंतर नामांतर केले, परंतु फाइल तपासण्यास नकार देण्यात आला. कर्मचाऱ्यांना ८.३३% बोनस बजेट असताना ५ महिन्यांचा बोनस देऊन ३ महिन्यांचा हिस्सा कॅशमध्ये काढून घेतला. याची रक्कम २३.६४ लाख असून, त्याचा वापर कुणासाठी झाला हे अस्पष्ट आहे. कर्जवसुलीसाठी नेमलेली वाहने कुणाच्या नावावर आहेत आणि त्यांचा खर्च कसा, याची कागदपत्रे नाकारली.

कर्जमर्यादेचे उल्लंघन करून युवराज बारंगुळे ग्रुपला ८.८१ कोटी, गणेश बारंगुळे ग्रुपला ६.७७ कोटी, रामगुडे ग्रुपला २५.०७ कोटी अशी कर्जे देण्यात आली. रिबेट आणि एक्स ग्रेसिया फक्त स्वतःच्या फर्मांना देऊन बँकेला फसवले. वैशाली हॉटेलला १.६४ लाख रिबेट, वैजिनाथ ट्रेडिंगला ४.६६ लाख असे लाभ दिले. क्विक मॉर्टॅलिटी केसेसमध्ये २०२२-२३ मध्ये ४.१२ कोटी, २०२३-२४ मध्ये ४.५४ कोटी नुकसान झाले.

एनपीए वाढण्यास कर्जवाटपातील निष्काळजीपणा जबाबदार असून, ७५ लाखांपेक्षा जास्त कर्जात ६१.५१ कोटी ओव्हरड्यू आहेत. खांडवी गावातील ९७ केसेसमध्ये ७० डिफॉल्टर आहेत, ज्यात गणेश बारंगुळे यांनी पदाचा गैरवापर केल्याचा आरोप आहे. भगवंत मार्केटिंग (८० लाख), आर.एस. एंटरप्रायजेस (७५ लाख) यांसारख्या फर्मांना उत्पन्नापेक्षा जास्त कर्ज देऊन डिफॉल्ट होऊ दिले.

चौकशी समितीने बँक प्रशासन, संचालक मंडळ आणि अधिकाऱ्यांना जबाबदार धरले असून, सभासद आणि ठेवीदारांची फसवणूक झाल्याचे म्हटले आहे. बँक अधिकाऱ्यांनी सहकार्य नाकारल्याने पूर्ण तपास बाकी आहे. याबाबत पोलिस तक्रार होण्याची शक्यता असून, बँकेतील सभासदांमध्ये असंतोष पसरला आहे.

KDM NEWS प्रतिनिधी 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मुख्याध्यापकांची निर्दोष मुक्तता: बार्शी न्यायालयाचा निकाल

**बार्शी बाजार समितीत शेतकऱ्यांची लूट: वरद ट्रेडर्सच्या चोरीचा व्हिडिओ व्हायरल, ड्रायव्हरांना कमिशन देऊन माल आणण्याचा गोरखधंदा**

सोलापुरात लाचखोर तलाठ्याला रंगेहाथ पकडले; सहायक महसूल अधिकाऱ्यावरही गुन्हा दाखल