**मुसळधार पावसामुळे सिना कोळेगाव धरणातून विसर्ग वाढ; ५५,४४० क्यूसेकपर्यंत सोडणार पाणी**
**मुसळधार पावसामुळे सिना कोळेगाव धरणातून विसर्ग वाढ; ५५,४४० क्यूसेकपर्यंत सोडणार पाणी**
**KDM NEWS प्रतिनिधी**परंडा, दि. २७ सप्टेंबर २०२५** : धाराशिव व सोलापूर जिल्ह्यातील सिना कोळेगाव धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सतत मुसळधार पाऊस कोसळत असल्याने धरणातील पाणीसाठा ९५ टक्क्यांपर्यंत पोहोचला असून, आज सकाळी १० वाजता विसर्ग ५०,००० क्यूसेकवरून ५५,४४० क्यूसेकपर्यंत वाढवण्यात येणार आहे. या निर्णयामुळे सिना नदीला पुन्हा महापूर येण्याची शक्यता असून, माढा, करमाळा, पंढरपूर, मंगळवेढा, दक्षिण सोलापूर, अक्कलकोटसह सात तालुक्यांत पुराचा धोका वाढला आहे.
धरण प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, २६ सप्टेंबरपर्यंत धरणाची पाणीपातळी ७४.२५ मीटर (पूर्ण क्षमता ७६.१८ मीटर) असून, साठवण क्षमता १५०.४३ एमसीएम आहे. गेल्या २४ तासांत पाण्याची आवक ७२,६७० क्यूसेकपर्यंत पोहोचली होती, तर विसर्ग ३२,५०० क्यूसेकवरून हळूहळू वाढवण्यात आला. आज पहाटे ८ वाजता ३९,५३५ क्यूसेक असलेला विसर्ग ४४,३५० क्यूसेकपर्यंत नेला गेला. सिना व्यतिरिक्त खासापुरी व चांदणी प्रकल्पांतूनही ७५,८१७ क्यूसेक एकूण विसर्ग सुरू असल्याने भीमेनदीतही पाणीपातळी वाढण्याची शक्यता आहे.
या आधी २३ सप्टेंबरला सिनेच्या महापुरामुळे सोलापूर शहर व परिसरात लाखो रुपयांचे नुकसान झाले होते. तेव्हा धरणातून ७०,००० क्यूसेक विसर्ग सोडण्यात आला होता. IMD ने २६ ते २९ सप्टेंबरपर्यंत कोकण व पश्चिम महाराष्ट्र घाटमाथ्यासाठी ऑरेंज व रेड अलर्ट जारी केला असून, पावसाचा जोर कायम राहिल्यास विसर्गात आणखी वाढ होऊ शकते.
**सावधानता बाळगा** : सिना नदीच्या दोन्ही काठावरील शेतकरी व नागरिकांनी सतर्क राहावे. नदीपात्रात पाणी सोडले जाणार असल्याने शेती, वाहतूक व वस्तींना धोका निर्माण होऊ शकतो. प्रशासनाने गावागावांत दवंडी दिली असून, NDRF व स्थानिक पथकांना सतर्क केले आहे. पावसाच्या प्रमाणानुसार विसर्गात घट-वाढ होण्याची शक्यता असल्याने वारंवार अपडेट घ्या, असे आवाहन कार्यकारी अभियंता, सिना कोळेगाव प्रकल्प विभाग, परंडा यांनी केले आहे.
KDM NEWS प्रतिनिधी
टिप्पण्या