*बार्शी अपघात प्रकरण : १४ महिने फरार चालकाला परभणीत अटक*

*बार्शी अपघात प्रकरण : १४ महिने फरार चालकाला परभणीत अटक* 

*KDM NEWS प्रतिनिधी बार्शी (सोलापूर), दि. ३ फेब्रुवारी : गाडेगाव रोडवर भरधाव ट्रॅव्हल्सने मॉर्निंग वॉक करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकाला धडक देऊन पळून जाणाऱ्या अपघात प्रकरणातील फरार आरोपी चालकाला बार्शी शहर पोलिसांनी परभणीतून अटक केली आहे. हा आरोपी गेल्या १४ महिन्यांपासून पोलिसांना गुंगारा देत होता. या कारवाईमुळे प्रकरणातील सर्व आरोपी आता पोलिसांच्या ताब्यात आले आहेत.

घटनेची पार्श्वभूमी अशी की, दि. ५ डिसेंबर २०२४ रोजी सकाळी बार्शीतील गाडेगाव रोडवर शांतीलाल उतरेश्वर बोराडे (रा. बार्शी) मॉर्निंग वॉक करत असताना एका भरधाव ट्रॅव्हल्सने त्यांना जोरदार धडक दिली. अपघातानंतर चालकाने कोणालाही माहिती न देता घटनास्थळ सोडले. या घटनेत बोराडे यांना गंभीर दुखापत झाली असून, बार्शी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १०४९/२०२४ अंतर्गत कलम १०६(१) बी.एन.एस.नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. ट्रॅव्हल्सचे मालक यापूर्वीच अटक झाले होते, मात्र चालक रफिक अफजल शेख (रा. रहिम नगर, परभणी) हा अपघातानंतर फरार झाला होता.

पोलिसांनी आरोपीचा शोध घेण्यासाठी मुंबई, परभणी आणि इतर ठिकाणी मोठ्या प्रमाणात शोधमोहीम राबवली, परंतु तो सापडत नव्हता. बार्शी शहर पोलीस ठाण्याचे अधिकारी बालाजी कुकडे यांच्या नेतृत्वाखाली एक विशेष पथक नेमण्यात आले. या पथकात पोलीस सब इन्स्पेक्टर महेश गळगटे, पोलीस नाईक संगप्पा मुळे आणि पोलीस कॉन्स्टेबल लखन घाडगे यांचा समावेश होता. संगप्पा मुळे यांनी परभणीत गोपनीय बातमीदारांच्या माध्यमातून आरोपीची माहिती मिळवली. आरोपी परभणीत लपून बसल्याचे कळताच, पोलिस निरीक्षक कुकडे यांनी तातडीने पथक परभणीकडे रवाना केले. तेथे आरोपीला ताब्यात घेऊन बार्शीला आणण्यात आले आणि कायदेशीर कारवाई पूर्ण करण्यात आली.

या यशस्वी कारवाईचे श्रेय जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक प्रितम यावलकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक सायकर यांच्या मार्गदर्शनाला जाते. पोलिसांनी या प्रकरणात तपासाची गती वाढवल्याने अपघातग्रस्तांना न्याय मिळण्याची आशा निर्माण झाली आहे. पोलिसांनी नागरिकांना अपघातानंतर घटनास्थळ सोडू नये आणि जबाबदार वाहन चालवावे, असा सल्ला दिला आहे.

KDM NEWS प्रतिनिधी 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

**बनावट खतांच्या मोठ्या साठ्यावर कृषी विभागाची धडक कारवाई; सोलापूरमध्ये शेतकऱ्यांची लाखोंची फसवणूक उघड, दोघांवर गुन्हा दाखल**

मुख्याध्यापकांची निर्दोष मुक्तता: बार्शी न्यायालयाचा निकाल

**बार्शी बाजार समितीत शेतकऱ्यांची लूट: वरद ट्रेडर्सच्या चोरीचा व्हिडिओ व्हायरल, ड्रायव्हरांना कमिशन देऊन माल आणण्याचा गोरखधंदा**