*बार्शी सेशन कोर्टाचा धडक निकाल: नवविवाहितेच्या क्रूर खून प्रकरणी जाऊला जन्मठेप*
*बार्शी सेशन कोर्टाचा धडक निकाल: नवविवाहितेच्या क्रूर खून प्रकरणी जाऊला जन्मठेप*
*KDM NEWS प्रतिनिधी बार्शी, दि. ११ फेब्रुवारी २०२६ ** माढा तालुक्यातील अंजनगाव उमाटे गावात नवविवाहित महिलेचा गळा आवळून खून करून मृतदेह जाळण्याच्या भयावह प्रकरणी बार्शी येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने आरोपी थोरली जाऊ गीता शंकर पाडुळे हिला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. या प्रकरणात पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने आरोपीने स्वत:ला जखमी करून बनाव रचल्याचा आरोप सिद्ध झाला असून, न्यायालयाने भारतीय दंड संहितेच्या कलम ३०२ अंतर्गत जन्मठेप व ५,००० रुपये दंड (दंड न भरल्यास ६ महिने अतिरिक्त कारावास) आणि कलम २०१ अंतर्गत ३ वर्षे कारावास व २,००० रुपये दंड (दंड न भरल्यास १ महिना अतिरिक्त कारावास) अशी दुहेरी शिक्षा ठोठावली. हा निकाल अतिरिक्त सत्र न्यायाधीश पी. डी. सुभेदार यांनी सुनावला, ज्यामुळे परिसरात न्यायव्यवस्थेवर विश्वास वाढला आहे.
या गुन्ह्याची पार्श्वभूमी अशी आहे की, मयत उज्वला सिद्धेश्वर जाधव हिचे लग्न किरण लक्ष्मण पाडुळे यांच्याशी २९ नोव्हेंबर २०२२ रोजी झाले होते. लग्नानंतर उज्वला सासरी पती, सासू, सासरे, दीर आणि जाऊ गीता यांच्यासोबत राहू लागली. काही दिवसांतच घरातील छोट्या-मोठ्या गोष्टींवरून वाद सुरू झाले. एकदा उज्वला माहेरी जाताना तिने आपले सोन्याचे मंगळसूत्र आणि कानातील रिंग कपाटात ठेवले होते. परत आल्यावर ते दागिने गायब झाल्याने तिने जाऊ गीता पाडुळे हिला विचारणा केली. यावरून दोघींमध्ये भांडण झाले आणि आरोपीच्या मनात चोरीचा आरोप घेतल्याचा राग बसला. हा राग इतका खोलवर रुजला की, तो खुनाच्या रुपात बाहेर आला.
२ फेब्रुवारी २०२३ रोजी घरात फक्त उज्वला आणि गीता या दोघीच होत्या. आरोपीने संधी साधून उज्वलाचा गळा आवळून तिचा जीव घेतला. पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह घरातच पेट्रोल ओतून जाळला. यानंतर आरोपीने आत्महत्येचा बनाव रचण्यासाठी घराच्या मुख्य दरवाजाला बाहेरून कुलूप लावले आणि किचनच्या दरवाजातून बाहेर पडली. स्वत:च्या अंगावर चाकूने जखमा करून तिने अज्ञात व्यक्तीने खून केल्याचा ड्रामा रचला. इतकेच नव्हे, तर घटनेच्या वेळी मी शेतात काम करत होते असे भासवण्याचा प्रयत्नही केला. मात्र, हे सर्व पुराव्यांच्या साखळीने उघड झाले.
मयत उज्वलाचे वडील सिद्धेश्वर जाधव यांनी माढा पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक १८/२०२३ दाखल केला. तत्कालीन सहायक पोलिस निरीक्षक शाम बुवा यांनी तपासाची सूत्रे हाती घेतली आणि आरोपीविरुद्ध सबळ पुरावा गोळा केला. दुय्यम अधिकारी पोलिस उपनिरीक्षक महमद शेख यांनीही या तपासात महत्त्वाची भूमिका बजावली. न्यायालयात दोषारोपपत्र दाखल झाल्यानंतर खटला सुरू झाला. हा खटला पूर्णपणे परिस्थितीजन्य पुराव्यावर आधारित होता, कारण कोणताही प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नव्हता. सरकारी पक्षाने १२ साक्षीदार तपासले, ज्यात फिर्यादी, घटनास्थळाचे पंच, आरोपीकडून जप्त केलेल्या चाकू आणि घराच्या चावीवरील पंच, आरोपीची वैद्यकीय तपासणी करणारे डॉक्टर आणि मोबाइल संभाषणाशी संबंधित नोडल अधिकारी यांचा समावेश होता. या साक्षींनी पुराव्यांची सुसंगत साखळी तयार केली.
सरकारी वकील दिनेश देशमुख यांनी उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाच्या विविध निकालांचे दाखले देत प्रभावी युक्तिवाद केला. त्यांनी आरोपीच्या कृत्याचे क्रूर स्वरूप आणि पुरावा नष्ट करण्याच्या प्रयत्नावर जोर दिला. दुसरीकडे, फिर्यादीकडून ॲड. धनंजय माने यांनी पीडित कुटुंबाची बाजू मांडली. कोर्ट पैरवीसाठी पोलिस हवालदार अमृत खेडकर आणि महिला पोलिस अमलदार रीना शेख यांनी साक्षीदारांना मार्गदर्शन करून न्यायालयात हजर राहण्यात मोलाची भूमिका बजावली. उपविभागीय पोलिस अधिकारी अशोक सायकर आणि पर्यवेक्षण अधिकारी सहायक पोलिस निरीक्षक नेताजी बंडगर यांनी तपास प्रक्रियेत सतत मार्गदर्शन केले.
KDM NEWS प्रतिनिधी
टिप्पण्या