*छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील जैतापूर केंद्रावर कॉपीचा प्रकार; १९ पर्यवेक्षक व केंद्रसंचालक निलंबित*

*छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील जैतापूर केंद्रावर कॉपीचा प्रकार; १९ पर्यवेक्षक व केंद्रसंचालक निलंबित* 

*KDM NEWS  छत्रपती संभाजीनगर, दि. १० (प्रतिनिधी)* - 'कॉपीमुक्त' अभियान राबवताना छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील जैतापूर येथील राष्ट्रीय उच्च माध्यमिक विद्यालय परीक्षा केंद्रावर बारावीच्या इंग्रजी विषयाच्या परीक्षेदरम्यान सामूहिक कॉपीचा गंभीर प्रकार उघडकीस आला. सीसीटीव्ही फुटेजमधून हा प्रकार स्पष्ट झाल्यानंतर जिल्हा प्रशासनाने तातडीने कारवाई करत १९ पर्यवेक्षक आणि केंद्रसंचालक यांना निलंबित केले. ही कारवाई विभागातील आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या कारवायांपैकी एक मानली जात आहे.

बारावीच्या परीक्षेदरम्यान सकाळच्या सत्रात इंग्रजी विषयाच्या पेपरवेळी २०० हून अधिक विद्यार्थी उपस्थित होते. परीक्षेदरम्यान विद्यार्थ्यांनी एकमेकांच्या उत्तरपत्रिका पाहणे, पूर्वतयारीच्या झेरॉक्स प्रती वापरणे असे गैरप्रकार केले. पर्यवेक्षकांच्या नाकावर टिच्चून हे सर्व चालले असल्याचे सीसीटीव्हीमध्ये कैद झाले. तक्रारी प्राप्त झाल्यानंतर शिक्षण विभागाच्या भरारी पथकाने केंद्राची तपासणी केली आणि फुटेज तपासून गैरप्रकार निश्चित केला.

जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि विभागीय शिक्षण मंडळाच्या अध्यक्षांच्या निर्देशानुसार ही कारवाई झाली. माध्यमिक शिक्षणाधिकारी यांच्या नेतृत्वाखालील पथकाने अहवाल सादर केला. निलंबित केलेल्यांमध्ये जिल्हा परिषदेचे कर्मचारी, बैठ्या पथकातील अधिकारी आणि खासगी शाळांशी संबंधित पर्यवेक्षकांचा समावेश आहे. खासगी शाळांवरील पर्यवेक्षकांवर संस्थांमार्फत शिस्तभंगाची कारवाई आणि कायदेशीर पावले उचलण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

या घटनेनंतर केंद्रावरील संपूर्ण कर्मचारी ताफा बदलण्यात आला असून, नवीन पर्यवेक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. परीक्षेची विश्वासार्हता अबाधित राहावी यासाठी हे पाऊल उचलले. छत्रपती संभाजीनगर विभागात कॉपीमुक्त अभियानाची अंमलबजावणी कठोरपणे होत असली तरी पर्यवेक्षकांच्या जबाबदारीकडे दुर्लक्ष होत असल्याचे हे प्रकरण दाखवते.

जिल्ह्यात बारावीच्या परीक्षा सुरू असून, एकूण ५० हजारांहून अधिक विद्यार्थी सहभागी आहेत. जैतापूर प्रकरणानंतर इतर केंद्रांवरही सीसीटीव्ही फुटेजची नियमित तपासणी वाढवण्यात आली आहे. शिक्षण विभागाने अशा प्रकारांविरुद्ध कठोर भूमिका घेण्याचे स्पष्ट केले असून, भविष्यात अशा घटनांना आळा बसवण्यासाठी अतिरिक्त उपाययोजना राबवल्या जाणार आहेत.

KDM NEWS प्रतिनिधी 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

**बनावट खतांच्या मोठ्या साठ्यावर कृषी विभागाची धडक कारवाई; सोलापूरमध्ये शेतकऱ्यांची लाखोंची फसवणूक उघड, दोघांवर गुन्हा दाखल**

मुख्याध्यापकांची निर्दोष मुक्तता: बार्शी न्यायालयाचा निकाल

**बार्शी बाजार समितीत शेतकऱ्यांची लूट: वरद ट्रेडर्सच्या चोरीचा व्हिडिओ व्हायरल, ड्रायव्हरांना कमिशन देऊन माल आणण्याचा गोरखधंदा**