*बार्शी : स्मार्ट मीटरमुळे घरगुती वीजबिल १२-१५ हजारांवर; परीक्षार्थी विद्यार्थ्यांचे अभ्यास अंधारात, रात्रभर महावितरण कार्यालयासमोर मुक्कामी आंदोलन*
*बार्शी : स्मार्ट मीटरमुळे घरगुती वीजबिल १२-१५ हजारांवर; परीक्षार्थी विद्यार्थ्यांचे अभ्यास अंधारात, रात्रभर महावितरण कार्यालयासमोर मुक्कामी आंदोलन*
*KDM NEWS प्रतिनिधी बार्शी, १ मार्च : यशवंत नगर परिसरातील तीन घरगुती ग्राहकांना नव्या स्मार्ट मीटरनंतर सहा महिन्यांतच अवाजवी वीजबिलांचा धक्का बसला आहे. मागील सहा महिन्यांत अमोल डोंगरे, नितीन देशमुख आणि प्रमोद कसबे या कुटुंबांना दरमहा १२ ते १५ हजार रुपयांची बिले येत आहेत. पूर्वी ७००-८०० रुपयांवरच राहणारे बिल अचानक दहापट वाढल्याने या गरीब कुटुंबांचा आर्थिक गळा दाटला आहे. स्मार्ट मीटर बसविल्यानंतर पहिल्या महिन्यातच १८ हजार, १५ हजार आणि ५ हजार रुपयांची बिले आली.
घरात फक्त बल्ब, ट्यूबलाइट, पंखा, टीव्ही आणि फ्रीजचा मर्यादित वापर असूनही बिल वाढणे संशयास्पद असल्याचे या नागरिकांचे म्हणणे आहे. हिवाळ्यात फ्रीज आणि पंखे बंद होते. तरीही बिल वाढले. याबाबत वाशी (बार्शी) महावितरण कार्यालयात वारंवार लेखी तक्रारी दाखल केल्या. अधिकाऱ्यांनी ‘पुढील बिलात समायोजन करू’ असे तोंडी आश्वासन दिले, पण प्रत्यक्षात कोणतीही दुरुस्ती झाली नाही. उलट थकबाकी वाढवून बिले पाठवली गेली.
थकबाकीमुळे ‘ऑटो डिस्कनेक्ट’ प्रणालीने वीज पुरवठा खंडित करण्यात आला. याचा थेट परिणाम या कुटुंबातील दहावी-बारावीच्या परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांवर झाला. सध्या परीक्षा काळ सुरू असताना घरात वीज नसल्याने अभ्यास अंधारात होत आहे. मोलमजुरी, रिक्षाचालन आणि चहाच्या टपरीवर उदरनिर्वाह करणाऱ्या या कुटुंबांना विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भविष्य धोक्यात आल्याची भीती वाटत आहे.
शनिवारी (२७ फेब्रुवारी) रात्री आठनंतर या विद्यार्थ्यांनी आणि कुटुंबीयांनी महावितरण कार्यालयासमोर अभ्यास करत मुक्कामी आंदोलन सुरू केले. शुक्रवारी रात्री ११.३० वाजतापासून महिलांसह लहान मुलेही कार्यालयाच्या प्रांगणात ठाण मांडून बसली. रात्रभर अभ्यास चालू ठेवला. दुसऱ्या दिवशीही वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून कोणतीही दखल घेतली गेली नाही. उलट बिल भरा, अन्यथा वीज जोडणी होणार नाही, असे सांगण्यात आले.
‘आमच्या मुलांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. बिल दुरुस्त करून तात्काळ वीजपुरवठा सुरू करा. अन्यथा होणाऱ्या नुकसानीस महावितरण व अधिकारी जबाबदार राहतील,’ असा इशारा कुटुंबीयांनी दिला आहे.
या प्रकरणात महावितरणकडून अद्याप कोणतेही अधिकृत स्पष्टीकरण आलेले नाही. बार्शी शहरात स्मार्ट मीटर बसविण्याच्या प्रक्रियेनंतर अशा तक्रारी वाढल्या आहेत. राज्यभरात स्मार्ट मीटर आणि टाइम ऑफ डे (TOD) दरामुळे अनेक ठिकाणी नागरिक नाराज आहेत. यशवंत नगर प्रकरणात तातडीने दखल घेऊन विद्यार्थ्यांचे नुकसान टाळावे, अशी मागणी आता स्थानिक स्तरावर होत आहे.
KDM NEWS प्रतिनिधी
टिप्पण्या