*सोलापुरात काँग्रेसने भारत-अमेरिका व्यापार कराराची प्रतीकात्मक होळी केली; शेतकरी-व्यापाऱ्यांसाठी घातक ठरेल असा आरोप*
*सोलापुरात काँग्रेसने भारत-अमेरिका व्यापार कराराची प्रतीकात्मक होळी केली; शेतकरी-व्यापाऱ्यांसाठी घातक ठरेल असा आरोप*
*KDM NEWS प्रतिनिधी सोलापूर, दि. २ मार्च २०२६ : सोलापूर शहर काँग्रेस कमिटीने आज भारत-अमेरिका व्यापार कराराच्या निषेधार्थ शहरात प्रतीकात्मक होळी पेटवली. लोकसभा खासदार प्रणिती शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शहर अध्यक्ष चेतनभाऊ नरोटे यांच्या नेतृत्वात ही आंदोलनात्मक घटना घडली. होळीनंतर 'नरेंद्र झाले सरेंडर', 'पीएम इज कॉम्प्रोमाइज्ड' अशा घोषणा देण्यात आल्या.
होळी पेटवताना चेतनभाऊ नरोटे म्हणाले, “होळी अनिष्ट प्रवृत्तींच्या दहनाचे प्रतीक आहे. आज या पवित्र अग्नीत देशहिताला धक्का देणारा एकतर्फी व्यापार करार जाळला जात आहे.” त्यांनी करारातील टॅरिफ रचनेवर तीव्र आक्षेप नोंदवला. अमेरिका भारताकडून येणाऱ्या मालावर १८ टक्के टॅरिफ आकारत असल्याचे सांगत, भारतात अमेरिकेच्या मालावर शून्य किंवा अत्यंत कमी टॅरिफ ठेवण्यात आल्याचे त्यांनी म्हटले. “ही अट पूर्णतः एकतर्फी आहे आणि भारताच्या अर्थव्यवस्थेला मारक ठरेल,” असे नरोटे यांचे मत होते.
नरोटे यांनी कराराच्या पार्श्वभूमीवर आकडेवारीही मांडली. २०१४ पूर्वी अमेरिकेकडून भारताच्या आयातीवर फक्त ३ टक्के टॅरिफ होता. नंतर मोदी सरकारच्या काळात तो २५ टक्क्यांवर गेला. रशियन क्रूड तेल आयातीमुळे आणखी २५ टक्के दंडात्मक टॅरिफ लादला गेला. एकूण ५० टक्के बोजा पडला. आता ट्रम्प प्रशासनाने पहिल्या २५ टक्क्यात ७ टक्क्यांची सवलत देऊन तो १८ टक्क्यांवर आणला. “ही सवलत म्हणजे दिलासा नव्हे, कारण १८ टक्के हे पूर्वीच्या ३ टक्क्यांपेक्षा कितीतरी जास्त आहे,” असे नरोटे म्हणाले. शिवाय, रशियन तेल खरेदी सुरू ठेवल्यास पुन्हा २५ टक्के टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेकडून देण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला.
करारानंतर अवघ्या काही दिवसांत सोयाबीन, मका, कापूस आणि तूर यांच्या दरात मोठी घसरण झाल्याचे नरोटे यांनी सांगितले. “हा करार शेतकरी, व्यापारी, वस्त्रोद्योग आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेसाठी मृत्यूघंटा ठरेल. मोठ्या प्रमाणात आयात वाढल्याने देशांतर्गत उद्योग बंद पडतील आणि रोजगार हिरावला जाईल,” असा इशारा त्यांनी दिला.
एपस्टाईन फाइल्स प्रकरणाचा संदर्भ देत नरोटे म्हणाले, “अमेरिकेतील या प्रकरणातून स्वतःची छबी वाचवण्यासाठी आणि दबावाखाली हा करार करण्यात आला. पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांच्या कन्या हिमानी पुरी यांच्या कंपनीला रॉबर्ट मिलार्डकडून ५७०० कोटी रुपयांचा निधी मिळाल्याचा आरोप आहे. देशहित साधले गेले की हा उघड देशद्रोह आहे, हा प्रश्न जनतेसमोर आहे.” राहुल गांधी यांच्या ‘देश विकला गेला’ या आरोपाची पुष्टी बाजारातील घसरणीतून होत असल्याचेही त्यांनी नमूद केले.
याप्रसंगी नगरसेवक नरसिंह आसादे, प्रदेश सचिव श्रीशैल रणदिरे, महिला अध्यक्ष प्रमिलाताई तूपलवंडे, भटक्या-विमुक्त सेल अध्यक्ष युवराज जाधव, मीडिया सेल अध्यक्ष तिरुपती परकीपंडला, सेवादल यंग ब्रिगेड अध्यक्ष विवेक कन्ना, असंघटित कामगार सेल अध्यक्ष सुभाष वाघमारे, माजी नगरसेवक हरुण शेख, एन. के. क्षिरसागर, माजी महिला अध्यक्ष हेमाताई चिंचोळकर, उपाध्यक्ष अंबादास गुत्तीकोंडा, बसवराज म्हेत्रे, अनिल मस्के, अशोक कलशेट्टी उपस्थित होते.
हा करार फेब्रुवारी २०२६ मध्ये जाहीर झाला असून, अमेरिकेने भारतावरचा टॅरिफ ५० टक्क्यांवरून १८ टक्क्यांवर आणला आहे. भारताने अमेरिकेच्या कृषी व इतर उत्पादनांसाठी बाजार खुला केला आहे. काँग्रेस पक्षाने देशभरात या कराराच्या विरोधात आंदोलने सुरू केली आहेत.
KDM NEWS प्रतिनिधी
टिप्पण्या