**१३ वर्षे कोमात असलेल्या हरीश राणाला इच्छामरणाची परवानगी; सर्वोच्च न्यायालयात भावनिक वातावरण**
*१३ वर्षे कोमात असलेल्या हरीश राणाला इच्छामरणाची परवानगी; सर्वोच्च न्यायालयात भावनिक वातावरण*
*KDM NEWS प्रतिनिधी नवी दिल्ली : गेल्या १३ वर्षांपासून कोमात असलेल्या हरीश राणा प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निर्णय देत त्याच्या पालकांना व्हेंटिलेटर आणि जीवनावश्यक कृत्रिम वैद्यकीय उपचार काढण्याची परवानगी दिली. या निर्णयानंतर न्यायालयात काही काळ शांत आणि उदास वातावरण निर्माण झाले. निकाल वाचताना न्यायमूर्ती जे.बी. पार्डीवाला भावनिक झाले असून त्यांच्या डोळ्यांत अश्रू तरळल्याचे दिसून आले.
न्यायमूर्ती जे.बी. पार्डीवाला आणि न्यायमूर्ती के. व्ही. विश्वनाथन यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला. हरीश राणा इच्छामरणाचा खटला देशभरात चर्चेचा विषय ठरला होता. या प्रकरणामुळे ‘सन्मानाने मरण्याचा अधिकार’ या महत्त्वाच्या प्रश्नावर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.
निकाल वाचताना न्यायमूर्ती पार्डीवाला म्हणाले की, हरीश राणा हा शिक्षणात हुशार विद्यार्थी होता. मात्र एका दुर्दैवी अपघातामुळे त्याचे संपूर्ण आयुष्य बदलून गेले. प्रकरणाची पार्श्वभूमी सांगताना न्यायमूर्ती काही काळ भावनिक झाले आणि त्यांचा आवाजही दाटून आल्याचे जाणवले.
खंडपीठाने आपल्या निर्णयात नमूद केले की, अशा प्रकरणांमध्ये रुग्णासाठी मृत्यू सोयीचा आहे की नाही हा प्रश्न नसतो, तर जीवन देणारे उपचार त्या रुग्णाच्या हिताचे आहेत का हा खरा मुद्दा असतो. न्यायालयाने निरीक्षण नोंदवले की हरीश राणा सध्या केवळ झोप आणि जागे होण्याच्या चक्रात अडकलेला आहे. तो इतर कोणत्याही गोष्टीला अर्थपूर्ण प्रतिसाद देऊ शकत नाही आणि दैनंदिन कामांसाठी पूर्णपणे इतरांवर अवलंबून आहे.
न्यायालयाने पुढे सांगितले की हरीश राणाला पीईजी ट्यूबद्वारे क्लिनिकली अॅडमिनिस्टर्ड न्यूट्रिशन (CAN) दिले जात आहे. मात्र गेल्या अनेक वर्षांमध्ये त्याच्या प्रकृतीत कोणतीही सुधारणा झालेली नाही.
२० ऑगस्ट २०१३ रोजी हरीश राणा चौथ्या मजल्यावरून पडल्यामुळे त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. त्या अपघातानंतर तो कोमात गेला आणि गेल्या दशकाहून अधिक काळ त्याची स्थिती कायम आहे. या प्रकरणात नवी दिल्लीतील एम्सच्या दुय्यम वैद्यकीय मंडळाने सादर केलेल्या वैद्यकीय अहवालाचा सर्वोच्च न्यायालयाने अभ्यास केला. अहवाल अत्यंत दुःखद असल्याचे नमूद करत न्यायालयाने अखेर इच्छामरणाला परवानगी दिली.
KDM NEWS प्रतिनिधी
टिप्पण्या