**बार्शी तालुक्यात छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबीर अभियान टप्पा १ : नारी, पानगाव, सुर्डी मंडळांत १५०० हून अधिक लाभार्थींना एकाच दिवशी शासकीय सेवांचा लाभ**

**बार्शी तालुक्यात छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबीर अभियान टप्पा १ : नारी, पानगाव, सुर्डी मंडळांत १५०० हून अधिक लाभार्थींना एकाच दिवशी शासकीय सेवांचा लाभ** 

*KDM NEWS प्रतिनिधी बार्शी (सोलापूर) : महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख आणि गतिमान करण्यासाठी राज्य सरकारच्या छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान टप्पा १ अंतर्गत बार्शी तालुक्यातील नारी, पानगाव आणि सुर्डी  मंडळांत १४ मार्च २०२६ रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत शिबिरे आयोजित करण्यात आली. या शिबिरांतून ग्रामीण भागातील शेतकरी, विद्यार्थी, महिला आणि सर्वसामान्य नागरिकांच्या महसुली तक्रारींचे त्वरित निराकरण झाले.

पानगाव मंडळातील पंचायत समिती सभापती मिनाक्षीताई रोंगे, उपविभागीय अधिकारी सदाशिव पडदुणे आणि तहसिलदार एफ. आर. शेख यांच्या उपस्थितीत शिबीर पार पडले. जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक आणि ग्राम महसूल अधिकारी यांच्यासह ४०० ते ५०० लाभार्थी उपस्थित होते.

नारी मंडळातील जिल्हा परिषद शाळा नारी येथे महसूल नायब तहसिलदार रविंद्र सानप, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य आणि सरपंच यांच्या उपस्थितीत शिबीर झाले. मंडळ अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक, आशा वर्कर व इतर विभागातील कर्मचारी उपस्थित होते. येथे सुमारे ६०० ते ७०० ग्रामस्थांनी सहभाग नोंदवला.

सुर्डी मंडळातील जिल्हा परिषद शाळा येथे निवासी नायब तहसिलदार, जिल्हा परिषद सदस्य सौ. सुजाता डोईफोडे, पंचायत समिती सदस्य सौ. काटे यांच्या उपस्थितीत शिबीर झाले. मंडळ अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी, कृषी सहाय्यक, ग्रामसेवक, आरोग्य सेवक आणि इतर कर्मचारी उपस्थित होते. येथे ५०० ते ६०० लाभार्थी उपस्थित राहिले.

आरोग्य विभागाने उपस्थितांची आरोग्य तपासणी केली. आधार केंद्रात १८ वर्षांखालील मुलांचे नवीन आधार कार्ड आणि नाव, पत्ता, जन्मतारीख यातील त्रुटी दुरुस्त केल्या. EKYC प्रलंबित शेतकऱ्यांचे EKYC पूर्ण करून अनुदान मिळवून दिले. अभिलेखातील तांत्रिक चुका दुरुस्त केल्या. सामाजिक सहाय्य योजनेच्या मंजुरी प्रमाणपत्रांचे वाटप झाले.

पंचायत समितीमार्फत दिव्यांग शालेय विद्यार्थ्यांना शालेय साहित्य किट आणि घरकूल वाळू वाटप पास वितरित केले. महा DBT अंतर्गत शेतकऱ्यांना शेतीउपयोगी साहित्य आणि ट्रॅक्टरचे वितरण झाले. विविध दाखले (उत्पन्न, रहिवासी, जात, नॉन-क्रिमिलेअर) वितरित करण्यात आले. नारी मंडळातील कारी गावातील शाळेत विशेष शिबीर घेऊन १७० दाखले दिले.

गरोदर आणि स्तनदा मातांना बेबी किट देण्यात आले. अपंग खातेदारांचे वय १८ वर्ष पूर्ण झाल्याने अपंग शेरा कमी केला. शेतकऱ्यांच्या पोटखराब क्षेत्राची दुरुस्ती करून ७/१२ उताऱ्यात लागवडीखालील क्षेत्र नोंदवले. तहसिलदारांच्या आदेशानुसार शेतरस्ता मंजुरीची नोंद ७/१२ मध्ये घेण्यात आली.

शिबीरात दिलेल्या प्रमुख सेवांची संख्या खालीलप्रमाणे :

- फेरफार निकाली काढले : ११३  
- ७/१२ दुरुस्ती : ४१  
- डिजिटल ७/१२ उपलब्ध : ४३०  
- ८-अ उतारा उपलब्ध : २९७  
- प्रमाणपत्रे वितरित : १०१० (उत्पन्न, रहिवासी, जात, नॉन-क्रिमिलेअर इ.)  
- एक खिडकी अंतर्गत अर्ज निकाली : ६५४  
- भूसंपादन पत्रके : ५  
- अकृषक पत्रके : ५  

अभियान टप्पा १ अंतर्गत पुढील शिबीर १० एप्रिल २०२६ रोजी गौडगाव आणि उपळे (दु.) मंडळात सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत आयोजित करण्यात येणार आहे. तहसिलदार एफ. आर. शेख यांनी गौडगाव व उपळे दु. मंडळातील सर्व नागरिकांना जास्तीत जास्त सहभाग नोंदवून शासकीय योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.

KDM NEWS प्रतिनिधी 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

**बनावट खतांच्या मोठ्या साठ्यावर कृषी विभागाची धडक कारवाई; सोलापूरमध्ये शेतकऱ्यांची लाखोंची फसवणूक उघड, दोघांवर गुन्हा दाखल**

मुख्याध्यापकांची निर्दोष मुक्तता: बार्शी न्यायालयाचा निकाल

**बार्शी बाजार समितीत शेतकऱ्यांची लूट: वरद ट्रेडर्सच्या चोरीचा व्हिडिओ व्हायरल, ड्रायव्हरांना कमिशन देऊन माल आणण्याचा गोरखधंदा**