**बार्शी राष्ट्रीय महालोकअदालतीत विक्रमी निकाल; २३७० प्रकरणे तडजोडीने निकाली, साडेतीन कोटींची वसुली**

**बार्शी राष्ट्रीय महालोकअदालतीत विक्रमी निकाल; २३७० प्रकरणे तडजोडीने निकाली, साडेतीन कोटींची वसुली** 
**बार्शी :** (KDM NEWS प्रतिनिधी)  
महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या निर्देशानुसार व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सोलापूर यांच्या मार्गदर्शनाखाली बार्शी न्यायालयात राष्ट्रीय महालोकअदालत आयोजित करण्यात आली. या एक दिवसाच्या विशेष उपक्रमात २३७० प्रकरणे परस्पर तडजोडीने निकाली काढण्यात यश आले असून एकूण ३ कोटी ४९ लाख २४ हजार ५८६ रुपयांची वसुली झाली आहे.

तालुका विधी सेवा समिती, बार्शी व बार्शी वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमाने ही लोकअदालत भरवण्यात आली. जिल्हा न्यायाधीश-१ तथा तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष विक्रमादित्य के. मांडे यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषविले. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष एम. एस. शर्मा यांच्या मार्गदर्शनात व सचिव पी. पी. पेटकर यांच्या सहकार्याने संपूर्ण आयोजन पार पडले.

बार्शी न्यायालयातील ४०४० प्रलंबित दिवाणी व तडजोडपात्र फौजदारी प्रकरणे तसेच ७१२४ दाखलपूर्व प्रकरणे अशा एकूण ११,१६४ प्रकरणांचा विचार करण्यात आला. यातील २३७० प्रकरणे समझोत्याने निकाली निघाली. प्रलंबित प्रकरणांमधून १ कोटी ६४ लाख ९२ हजार ५६४ रुपये तर दाखलपूर्व प्रकरणांमधून १ कोटी ८४ लाख ३२ हजार २२ रुपये वसूल झाले.

लोकअदालतीसाठी बार्शी न्यायालयात पाच स्वतंत्र पॅनल कार्यरत होते. विविध न्यायालयांतील न्यायाधीशांनी प्रकरणांमध्ये सक्रिय मध्यस्थी केली. काही पक्षकारांच्या अडचणी लक्षात घेऊन न्यायाधीश स्वतः दालनाबाहेर जाऊन तडजोड प्रक्रिया पूर्ण केल्याची विशेष नोंद घेण्यासारखी बाब होती.

एका मोटार अपघात प्रकरणात १७ लाख २५ हजार रुपयांची नुकसानभरपाई मंजूर करण्यात आली. एन.आय. अॅक्ट १३८ अंतर्गत १८ प्रकरणे तडजोडीने निकाली निघाली व त्यातून ३ लाख ६८ हजार ३५४ रुपये वसूल झाले. रक्कम वसुलीच्या १२ प्रकरणांतून १ कोटी १५ लाख ८ हजार २२७ रुपये जमा झाले. तडजोडपात्र फौजदारी प्रकरणांपैकी ५ प्रकरणे व कबुलीच्या ९४ प्रकरणांचा निकाल लागला; यातून १ लाख ३३ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

बार्शी वकील संघाचे अध्यक्ष रणजित गुंड, पॅनल विधिज्ञ, न्यायालयीन कर्मचारी, पोलीस कर्मचारी, बँका, फायनान्स कंपन्या, पंचायत समिती बार्शी व महावितरण यांच्या प्रतिनिधींचे विशेष सहकार्य लाभले. पक्षकारांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याने अनेक प्रकरणांचा जलद व तडजोडीने निपटारा शक्य झाला.

KDM NEWS प्रतिनिधी 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

**बनावट खतांच्या मोठ्या साठ्यावर कृषी विभागाची धडक कारवाई; सोलापूरमध्ये शेतकऱ्यांची लाखोंची फसवणूक उघड, दोघांवर गुन्हा दाखल**

मुख्याध्यापकांची निर्दोष मुक्तता: बार्शी न्यायालयाचा निकाल

**बार्शी बाजार समितीत शेतकऱ्यांची लूट: वरद ट्रेडर्सच्या चोरीचा व्हिडिओ व्हायरल, ड्रायव्हरांना कमिशन देऊन माल आणण्याचा गोरखधंदा**