**एसटी महामंडळात १७,७४२ पदांची मेगाभरती; कंत्राटी पद्धतीने चालक-वाहक भरती लवकरच**
**एसटी महामंडळात १७,७४२ पदांची मेगाभरती; कंत्राटी पद्धतीने चालक-वाहक भरती लवकरच**
*KDM NEWS प्रतिनिधी मुंबई, १७ मार्च २०२६ : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एमएसआरटीसी) मध्ये चालक, वाहक व इतर कर्मचाऱ्यांसाठी तब्बल १७,७४२ पदांची मेगाभरती होणार आहे. ही भरती मुख्यतः कंत्राटी पद्धतीने केली जाणार असून, महामंडळाच्या ताफ्यात येत असलेल्या ८,३०० नव्या बसेस चालवण्यासाठी आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याचा उद्देश आहे. राज्याचे परिवहन मंत्री व महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी विधान परिषदेत ही घोषणा केली.
सरनाईक यांनी सांगितले की, महामंडळ अधिक सक्षम व आधुनिक करण्यासाठी दरवर्षी ५,००० नव्या बसेस खरेदी करण्याचे धोरण राबवले जात आहे. यामुळे प्रवासी सेवेत वाढ होत असून, महिलांसह ज्येष्ठ नागरिकांसाठी दिल्या जाणाऱ्या सवलतींमुळे प्रवासी संख्याही वाढली आहे. सध्याच्या १४,००० हून अधिक बसेसच्या ताफ्यात नव्या बसेस दाखल होत असल्याने तातडीने चालक व सहाय्यक वाहकांची गरज भासत आहे.
या भरतीत सुमारे १७,४५० पदे चालक व सहाय्यक वाहकांसाठी असून, निवड झालेल्या उमेदवारांना महामंडळाकडून प्रशिक्षण दिले जाईल. मासिक वेतन सुमारे ३०,००० रुपये असण्याची शक्यता आहे. भरती प्रक्रिया ई-निविदा पद्धतीने राबवली जाणार असून, राज्यातील सहा प्रादेशिक विभागांनुसार अंमलबजावणी होईल.
२०२२ मधील एसटी संप काळात कंत्राटी पद्धतीने सेवा दिलेल्या कर्मचाऱ्यांना या नव्या भरतीत प्राधान्य देण्यात येणार आहे. त्यामुळे अनुभवी कर्मचाऱ्यांना मोठी संधी मिळेल. नियमित पदांसाठी अर्थ विभागाकडे प्रस्ताव पाठवण्यात आला असून, मंजुरी मिळाल्यानंतर त्या दिशेने पावले उचलली जातील. तोपर्यंत कंत्राटी भरतीने सेवा सुरळीत ठेवण्यावर भर देण्यात येणार आहे.
ही भरती बेरोजगार तरुण-तरुणींसाठी मोठी संधी ठरणार असून, भरती प्रक्रिया लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे.
KDM NEWS प्रतिनिधी
टिप्पण्या