*बार्शी तालुक्यात अमली पदार्थांचा उघड बाजार: छोट्या युजर्सना जाळ्यात, मोठ्या ड्रग माफियांना संरक्षण! हे कारवाई की नाटक?*
*बार्शी तालुक्यात अमली पदार्थांचा उघड बाजार: छोट्या युजर्सना जाळ्यात, मोठ्या ड्रग माफियांना संरक्षण! हे कारवाई की नाटक?*
*KDM NEWS विशेष प्रतिनिधी, बार्शी : सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यात अमली पदार्थांची तस्करी आणि विक्री थेट ‘ओपन मार्केट’ बनली आहे. पोलिस यंत्रणा मोठमोठ्या जप्तींचा ढोल वाजवते, फोटो काढते, पण खर्या मुळापर्यंत पोहोचत नाही. उलट छोट्या-छोट्या ‘युजर्स’ना, वृद्धांना, गरिबांना पकडून ‘कारवाई’ दाखवली जाते. हा सगळा नाटक आहे की राजकीय-आर्थिक संरक्षणामुळे मोठे ड्रग्ज माफिया निर्भय आहेत?
*भोयरे शिवारातील ‘रेकॉर्डब्रेक’ जप्ती... फक्त शो?
ऑगस्ट २०२५ मध्ये ६९२ किलो गांजा जप्त झाला, तीन वाहने जप्त झाली, एक उपसरपंच अटक झाला... आणि? ट्रक-कारचे मुख्य चालक फरार, ओडिशा-आंतरराज्यीय टोळीशी कनेक्शनचा तपास ‘चालू’ आहे, चार्जशीटपूर्वी आरोपींना जामीन... म्हणजे सगळे ‘पुन्हा सुरू’! एक कोटी ६० लाखांचा मुद्देमाल जप्त झाला तरी तालुक्यात गांजा, एमडी, गुटखा, मटका, दारू यांची खुलेआम विक्री कशी चालू आहे? पोलिस अधीक्षक, उपविभागीय अधिकारी, निरीक्षक... सगळे ‘मार्गदर्शन’ देतात, पण रस्त्यावर प्रत्यक्षात काहीच बदल नाही!
*गौडगाव बस स्टँड प्रकरण : हा तर खुला अपमान!*
१ मार्च २०२६ रोजी वैराग पोलिसांनी ७४ वर्षीय मुकुंद बापुराव माळी यांना ‘गांजा ओढताना’ रंगेहाथ पकडले. शर्टाच्या खिशात पुंगळी आणि काडीपेटी... एनडीपीएस कलम २७. वृद्ध माणूस बस स्टँड मागे बसून गांजा ओढतोय... पण तो गांजा कोण पुरवतो? कोण विकतो? कोण त्या पत्राशेडजवळ उघड्या बाजारात विक्री करतो?यावर एक शब्दही नाही! पोलिस म्हणतात ‘गोपनीय माहितीवर कारवाई’... मग पुरवठादाराची गोपनीय माहिती का येत नाही?
गुटखा, मटका, दारू तर बार्शी शहर, ग्रामीण भागात खुलेआम विकली जाते. दुकाने, चहाच्या टपऱ्या, बस स्टँड... सगळीकडे. एप्रिल-मे २०२५ मध्ये ४६२ ग्रॅम गांजा, एमडी आणि पिस्तूल जप्त झाले, ९ आरोपी अटक... पण बक्षीस घेऊन पोलिस ‘मिशन पूर्ण’ म्हणतात. मग त्या ९ पैकी किती जण आजही धंदा करतात? किती जणांना राजकीय पाठबळ आहे?
*प्रश्न प्रशासनाला :
१. ७४ वर्षीय इसमाला गांजा पुरवणारा कोण? त्याला का अटक नाही?
२. भोयरे शिवारातील तस्करी टोळीचा मुख्य सूत्रधार कोण? फरार चालक आज कुठे आहेत?
३. ग्रामीण रस्त्यांवर आंतरराज्यीय ड्रग्ज वाहतूक चालू असताना नाकाबंदी फक्त ‘फोटोसेशन’साठी का?
४. गुटखा-मटका-दारू-गांजा यांचे ‘सुरक्षित’ नेटवर्क कोण चालवतो? स्थानिक राजकीय नेते, सरपंच, उपसरपंच यांना का संरक्षण?
बार्शी तालुक्यातील तरुण, विद्यार्थी, शेतकरी... सगळे या विषात बुडत आहेत. पोलिस म्हणतात ‘मोहीम जोरात’, पण वास्तवात फक्त छोट्या माशांना जाळ्यात अडकवून मोठ्या माशांना समुद्रात सोडले जाते. ही कारवाई नाही, ही ‘दिखावा कारवाई’ आहे. स्थानिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करणारे अधिकारी स्वतःच सतर्क का नाहीत?
*प्रशासन जागे हो! नाहीतर उद्या बार्शी ‘ड्रग्ज हब’ म्हणून ओळखला जाईल... आणि त्या दिवशी ‘रेकॉर्डब्रेक जप्ती’चे फोटो काढण्यासाठीही कोणी उरलेलं नाही!
KDM NEWS प्रतिनिधी
टिप्पण्या