**विद्युत कंपनीला ४४० व्होल्टचा 'न्यायाचा झटका' : बार्शी अतिरिक्त जिल्हा न्यायालयाने दिली ७ लाख रुपयांची नुकसान भरपाई**
**विद्युत कंपनीला ४४० व्होल्टचा 'न्यायाचा झटका' : बार्शी अतिरिक्त जिल्हा न्यायालयाने दिली ७ लाख रुपयांची नुकसान भरपाई**
*KDM NEWS प्रतिनिधी बार्शी अतिरिक्त जिल्हा न्यायालयाचे न्यायाधीश श्री. विक्रमादित्य मांडे यांनी ६ फेब्रुवारी २०२५ रोजी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीला महत्त्वाचा आदेश दिला आहे. करमाळा तालुक्यातील बोरगांव येथील शेतकरी सौ. अरुणा नवनाथ चौधरी यांना ७ लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्याचे निर्देश दिले आहेत. त्यासोबत दावा दाखल केल्याच्या तारखेपासून ७ टक्के दराने व्याजही द्यावे लागेल.
प्रकरणाची हकीकत अशी : सौ. चौधरी यांच्या गट नंबर १२८/२ (क्षेत्रफळ १ हेक्टर ६५ आर) या शेतीत सोलापूर जिल्हा सहकारी बँकेकडून कर्ज घेऊन मोठ्या प्रमाणात सुधारणा केल्या होत्या. त्यात आडसाली फुले को-२६५ जातीचे ऊस व २०० नारळी झाडांची लागवड केली होती. ऊस ४०-४२ कांड्यावर तयार झाला होता व गाळपासाठी योग्य झाला होता.
महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीने या शेतात ११ के.व्ही. विद्युत लाईन टाकण्यासाठी खांब उभे केले व तारे ओढले. शेतकऱ्यांनी याला विरोध केला असतानाही काम सुरू ठेवले. कंपनीच्या निष्काळजीपणामुळे तारे व्यवस्थित नसल्याने २१ सप्टेंबर २०१० रोजी शॉर्ट सर्किट झाले. त्यामुळे संपूर्ण ऊसाचे पीक व १०० नारळी झाडे जळून खाक झाले. प्रचंड आर्थिक नुकसान झाले.
त्यानंतर चौधरी यांनी तहसीलदार व करमाळा पोलिस स्टेशनला अर्ज दिला. ‘अकस्मात आग’ म्हणून १५ ऑक्टोबर २०१० रोजी नोंद झाली, पण कोणतीही भरपाई मिळाली नाही. नाईलाजाने २०११ मध्ये त्यांनी अॅड. प्रशांत शेटे व अॅड. हिरडे यांच्या मार्फत बार्शी येथील वरिष्ठ न्यायालयात विशेष मुद्दा क्रमांक ९८/२०११ दाखल केला. विद्युत निरीक्षकांच्या अहवालात कंपनीच्या खांब, तारा व शॉर्ट सर्किटमुळे दुर्घटना झाल्याचे स्पष्ट नमूद होते.
प्रथम न्यायालयात (न्यायाधीश जगदिश दळवी) दावा फेटाळला गेला. त्यावर अरुणा चौधरी यांनी जिल्हा न्यायालयात अपील दाखल केले. दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकून अपील अंशतः मान्य करत न्यायाधीश मांडे यांनी वरील आदेश दिला. अॅड. प्रशांत शेटे यांनी सतत १६ वर्षे पाठपुरावा केला.
या निकालामुळे शेतकरी महिलेच्या जिद्दीचे कौतुक होत आहे. विद्युत कंपनीच्या निष्काळजीपणामुळे झालेल्या नुकसानीसाठी न्याय मिळाला असल्याचे शेतकऱ्यांकडून म्हटले जात आहे.
टिप्पण्या