**बार्शी:पांगरी येथे विनापरवाना ४६० लिटर डिझेलसह पिकअप टँकर जप्त; आखाती युद्धाच्या पार्श्वभूमीवर कडक कारवाई**
**बार्शी:पांगरी येथे विनापरवाना ४६० लिटर डिझेलसह पिकअप टँकर जप्त; आखाती युद्धाच्या पार्श्वभूमीवर कडक कारवाई**
*KDM NEWS प्रतिनिधी बार्शी, १६ मार्च २०२६: आखाती युद्धामुळे (इस्रायल-अमेरिका विरुद्ध इराण) पेट्रोलियम पदार्थांच्या पुरवठ्यात ताण येत असताना, सोलापूर जिल्ह्यातील पांगरी येथे विनापरवाना डिझेल वाहतुक करणारा एक टँकर पोलिसांनी जप्त केला. या कारवाईत अंदाजे ४६० लिटर डिझेल (बाजारमूल्य रु. ४१,७३१) जप्त झाले असून, प्रकरणात अत्यावश्यक वस्तू अधिनियम १९५५ च्या कलम ३ व ७ तसेच भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम २८५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पांगरी पोलीस ठाण्यात नोंदवलेल्या प्रथम खबर अहवालानुसार तहसील कार्यालयाला विनापरवाना डिझेलची गावोगावी विक्री होत असल्याची माहिती मिळाली. तहसीलदारांच्या आदेशानुसार गोदाम व्यवस्थापक ऋषीकेश सुभाष धनवडे (वय ४४, रा. बार्शी) आणि पुरवठा लिपीक अमित शेळवणे हे तपासणीसाठी पांगरी येथे दाखल झाले.
येडशी-बार्शी रस्त्यावर हॉटेल जय भवानीसमोर सकाळी ११ वाजता ग्राम महसूल अधिकाऱ्यांनी थांबवलेली पांढऱ्या रंगाची महिंद्रा पिकअप (टँकर) क्र. MH-25-AJ-8025 ही गाडी तपासली असता, त्यात ४६० लिटर डिझेल (प्रति लिटर रु. ९०.७२ दराने) आढळले. चालक अजय भारत कसबे (रा. मोहा, ता. कळंब, जि. धाराशिव) याने चौकशीत सांगितले की, तो गावोगावी फिरून डिझेल विक्री करत असतो. त्याच्याकडे वाहतुक व विक्रीचा कोणताही परवाना नसल्याचे उघड झाले.
शासनाने युद्धाच्या पार्श्वभूमीवर पेट्रोलियम पदार्थांच्या बेकायदा वाहतुक व विक्रीवर कडक निर्बंध घातले असून, अशा प्रकरणांत त्वरित कारवाईचे आदेश दिले आहेत. वाहनचालक व गाडी पोलिसांच्या ताब्यात असून, पुढील तपास सुरू आहे. स्थानिक अधिकाऱ्यांनी सांगितले की, युद्धामुळे डिझेलच्या किमतींवर दबाव असताना अशा घटना रोखणे गरजेचे आहे.
KDM NEWS प्रतिनिधी
टिप्पण्या