**भिवंडीत गॅस सिलिंडर काळाबाजार; ठाणे शिधावाटप ‘फ’ परिमंडळाच्या भरारी पथकाने ८४ सिलिंडर जप्त**
**भिवंडीत गॅस सिलिंडर काळाबाजार; ठाणे शिधावाटप ‘फ’ परिमंडळाच्या भरारी पथकाने ८४ सिलिंडर जप्त**
*KDM NEWS प्रतिनिधी भिवंडी: पश्चिम आशियातील युद्धामुळे गॅस पुरवठ्यात निर्माण झालेल्या संभ्रमाचा फायदा घेत काही ठिकाणी व्यावसायिक गॅस सिलिंडरचा काळाबाजार सुरू झाल्याने ठाणे शिधावाटप विभागाच्या ‘फ’ परिमंडळातील भरारी पथकाने भिवंडीतील वालपाडा येथील वर्धमान टॉवर/कंपाउंड परिसरात शनिवारी अचानक छापा टाकला. या कारवाईत अनधिकृत साठवणुकीतील ८४ गॅस सिलिंडर जप्त करण्यात आले. तीन टेम्पो देखील जप्त करण्यात आले असून, दोन टेम्पो चालकांना ताब्यात घेण्यात आले आहे. संबंधित गोदाम मालक फरार असून, त्यांच्यावर जीवनावश्यक वस्तू कायदा १९५५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
उपनियंत्रक शिधावाटप प्रशांत काळे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक भगवान खंडेराव, गणेश हरणे, मनीष शास्त्री आणि भिवंडी शिधावाटप अधिकारी रत्नदीप सावंत यांच्या पथकाने ही कारवाई केली. वर्धमान कंपाउंडमधील गोदामात घरगुती आणि व्यावसायिक सिलिंडर मोठ्या प्रमाणात साठवून चढ्या दराने विक्री केली जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर पथकाने सापळा रचला. जप्त सिलिंडरमध्ये भारत गॅस, एचपी गॅस, गो गॅस आणि गॅस वन या कंपन्यांचे १४ किलोचे घरगुती तसेच १७, १९ व २१ किलोचे व्यावसायिक सिलिंडर समाविष्ट आहेत. यातील ५१ रिकामे आणि ३३ भरलेले सिलिंडर होते.
इराण-इस्राईल-अमेरिका युद्धाच्या पार्श्वभूमीवर गॅसटंचाईच्या अफवा आणि सोशल मीडियावरील चुकीच्या माहितीमुळे काळाबाजार वाढला होता. बाजारात हे सिलिंडर ४ ते ५ हजार रुपयांपर्यंत विकले जात असल्याचे समोर आले. नारपोली पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून, पथकाने इतर ठिकाणीही अशा अनधिकृत साठवणुकीवर कारवाई करण्याची तयारी दर्शवली आहे.
KDM NEWS प्रतिनिधी
टिप्पण्या