**२१ वर्षांत २५ बदल्या; मुंडे यांना आपत्ती व्यवस्थापन, पुनर्वसन, महसूल आणि वन विभागाची अतिरिक्त जबाबदारी**
**२१ वर्षांत २५ बदल्या; मुंडे यांना आपत्ती व्यवस्थापन, पुनर्वसन, महसूल आणि वन विभागाची अतिरिक्त जबाबदारी**
**KDM NEWS मुंबई| प्रतिनिधी** राज्य शासनाने ३१ मार्च २०२६ रोजी प्रशासकीय फेरबदल करत १० वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या जाहीर केल्या. यामध्ये कडक शिस्त, निर्णयक्षमता आणि गैरव्यवहाराविरोधात कठोर कारवाईसाठी ओळखले जाणारे २००५ बॅचचे आयएएस अधिकारी **तुकाराम मुंडे** यांचाही समावेश आहे.
सध्या दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव म्हणून कार्यरत असलेल्या मुंडे यांना आता **आपत्ती व्यवस्थापन, पुनर्वसन व मदत कार्य, महसूल आणि वन विभाग** या तीन महत्त्वाच्या विभागांची सचिवपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. ही त्यांच्या २१ वर्षांच्या कारकिर्दीतील **२५वी बदली** ठरली आहे.
..*वारंवार बदल्यांचा विक्रम
गेल्या २१ वर्षांत मुंडे यांची ही २५वी बदली आहे. प्रशासनात इतक्या वारंवार बदल्या होणाऱ्या अधिकाऱ्यांमध्ये त्यांचे नाव अग्रस्थानी आहे. ऑगस्ट २०२५ मध्ये असंघटित कामगार विकास आयुक्त पदावरून त्यांची दिव्यांग कल्याण विभागाच्या सचिवपदी नियुक्ती झाली होती. अवघ्या आठ महिन्यांतच त्यांना नवीन जबाबदारी देण्यात आली.
दिव्यांग कल्याण विभागात मुंडे यांनी बोगस दिव्यांग प्रमाणपत्रे, बोगस संस्था आणि खोट्या आरक्षणाचा वापर करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर मोठ्या प्रमाणात कारवाई केली. शेकडो बोगस संस्थांची नोंदणी रद्द करणे, ऑनलाइन प्रक्रिया मजबूत करणे आणि खऱ्या दिव्यांग व्यक्तींसाठी हक्काधारित यंत्रणा उभी करण्यावर भर दिला. यामुळे विभागात मोठा कायापालट झाला, पण त्याच वेळी काही स्तरांवर नाराजगीही निर्माण झाली.
नवीन जबाबदारीचे महत्त्व
आपत्ती व्यवस्थापन, पुनर्वसन व मदत कार्य, महसूल आणि वन विभाग ही राज्याच्या विकास, संकट निवारण आणि संसाधन व्यवस्थापनाशी निगडित महत्त्वाची खाती आहेत. मुंडे यांची धडाडी आणि शिस्तबद्ध कामपद्धती लक्षात घेता, या विभागांतील सुधारणा आणि पारदर्शकता वाढेल, अशी प्रशासनातील अपेक्षा आहे.
या फेरबदलात इतर प्रमुख नियुक्त्या अशा:
- अश्विनी भिडे यांना मुंबई महानगरपालिका आयुक्तपद
- लोकेश चंद्र यांना मुख्यमंत्री कार्यालयाचे अतिरिक्त मुख्य सचिव
- मनिक यांना दिव्यांग कल्याण विभागाचे सचिवपद (मुंडे यांच्या जागी)
तुकाराम मुंडे यांची कारकिर्द नेहमीच चर्चेत राहिली आहे. सोलापूर जिल्हाधिकारी, PMPML पुणे, नाशिक आणि नागपूर महानगरपालिका आयुक्त, आरोग्य विभाग, पशुसंवर्धन विभाग अशा विविध पदांवर काम करताना त्यांनी शिस्त, पारदर्शकता आणि जनकेंद्रित सुधारणा यावर भर दिला. मात्र, कठोर कारवाईमुळे अनेकदा राजकीय आणि प्रशासकीय स्तरावर खटके उडाले आणि बदल्या झाल्या.
प्रशासन वर्तुळात ‘सिंघम’ म्हणून ओळखले जाणारे मुंडे यांच्या नवीन जबाबदारीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. नियम आणि कायद्यानुसार काम करण्याची त्यांची शैली याही विभागात काय परिणाम साधेल, याकडे लक्ष असेल.
KDM NEWS प्रतिनिधी
टिप्पण्या