**कामगारच निघाला दरोडेखोर: धाराशिव स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई, १ लाख १४ हजारांच्या लुटीचा छडा; दोघांना अटक**
**कामगारच निघाला दरोडेखोर: धाराशिव स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई, १ लाख १४ हजारांच्या लुटीचा छडा; दोघांना अटक**
**KDM NEWS प्रतिनिधी धाराशिव**धाराशिव, १ एप्रिल २०२६: सोलापूर-हैदराबाद महामार्गावरील दाळींब येथे २८ मार्चला घडलेल्या फिल्मी स्टाइल दरोड्यात १ लाख १४ हजार रुपयांची रोख रक्कम लुटण्याच्या गुन्ह्याचा छडा धाराशिव स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या तीन दिवसांत लावला. या कारवाईत दोन आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून ४२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. उर्वरित चार आरोपी फरार असून त्यांचा शोध सुरू आहे.
२८ मार्च २०२६ रोजी लातूर येथील फिर्यादी हृषिकेश जाधव हे मुरूम येथून माल उतरवून मिळालेली १ लाख १४ हजार रुपयांची रोख रक्कम घेऊन गाडीतून जात होते. दाळींब परिसरात मोटारसायकल व पांढऱ्या रंगाच्या इनोव्हा कारमधील सहा इसमांनी त्यांची गाडी अडवली. आरोपींनी जाधव व चालकाला मारहाण करून रोख रक्कम हिसकावून घेतली व पळ काढला. या प्रकरणी मुरूम पोलीस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोलीस अधीक्षक रितू खोखर यांनी गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन तातडीने तपासाचे आदेश दिले. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तांत्रिक विश्लेषण, गोपनीय माहिती व सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा माग काढला. ३१ मार्च रोजी दोन मुख्य आरोपींना कंटेकूर (धाराशिव) येथून ताब्यात घेण्यात आले.
अटक झालेल्या आरोपींपैकी अभिषेक राजेंद्र कावडे (वय १९, रा. कंटेकूर) हा मुरूम येथील उज्वला किराणा दुकानात कामगार म्हणून काम करत होता. त्याने फिर्यादींकडे मोठी रोख रक्कम असल्याचे पाहिले होते. त्यानंतर त्याने आपल्या साथीदारांना ही माहिती दिली व दरोड्याचा कट रचला. तो या दरोड्याचा सूत्रधार ठरला आहे. दुसरा आरोपी दत्ता व्यंकट जमादार (वय ३३, रा. कंटेकूर) याच्याही साथीने ही लूट करण्यात आली.
अटक झालेल्या दोघांकडून २० हजार रुपये रोख रक्कम व दोन मोबाईल फोन असा एकूण ४२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई अपर पोलीस अधीक्षक शफकत आमना यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार, सहायक पोलीस निरीक्षक सुदर्शन कासार व त्यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.
पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, कामगार असलेल्या अभिषेकने स्वतः फिर्यादींची हालचाल पाहून दरोडा घडवून आणला, ही बाब तपासात धक्कादायक ठरली आहे. फरार आरोपींना लवकरात लवकर जेरबंद करण्यासाठी पथक प्रयत्नशील आहे.
KDM NEWS प्रतिनिधी
टिप्पण्या