**अकोला पोलिस ठाण्यात धक्कादायक प्रकार; कोठडीतील महिलेकडे मुलीची मागणी करणारा एएसआय निलंबित**

**अकोला पोलिस ठाण्यात धक्कादायक प्रकार; कोठडीतील महिलेकडे मुलीची मागणी करणारा एएसआय निलंबित** 

**KDM NEWS प्रतिनिधी अकोला** अकोला २ एप्रिल** – सिव्हिल लाईन पोलिस ठाण्यात कार्यरत सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक (एएसआय) राजेश जाधव याने मंगळवारी सायंकाळी ७.३० च्या सुमारास पोलीस कोठडीतील एका महिला आरोपीकडे ‘तुझ्या मुलीला एक रात्र माझ्याकडे पाठव, १० हजार रुपये देतो’ अशी अश्लील मागणी केल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. या प्रकरणी जिल्हा पोलिस अधीक्षक अर्चित चांडक यांनी तात्काळ कारवाई करत जाधव यांना निलंबित केले असून, त्याच्यावर विनयभंगासह विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी एएसआय सध्या फरार असून, स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्याचा शोध सुरू केला आहे.

प्राप्त माहितीनुसार, ८० लाख रुपयांच्या आर्थिक फसवणुकीच्या (सायबर फ्रॉड) प्रकरणात अकोला सायबर सेलने मुंबई-पालघर परिसरातून एका महिलेसह पुरुष आरोपीला अटक केली होती. न्यायालयाने महिलेला चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावल्याने तिला सिव्हिल लाईन पोलिस ठाण्यातील लॉकअपमध्ये ठेवण्यात आले होते. याच ठिकाणी कर्तव्यावर असलेल्या एएसआय राजेश जाधवने प्रथम महिलेकडे तिच्या मुलीच्या वयाची चौकशी केली. त्यानंतर त्याने ‘तुझी मुलगी माझ्याकडे पाठव, पैसे देईन’ अशी मागणी केल्याचा दावा महिलेनं लेडी कॉन्स्टेबल आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे केला.

ही बाब समजताच ठाण्यातील निरीक्षक अनिल जुमडे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि जाधव यांना सर्वांसमोर चांगलेच खडेबोल सुनावले. ‘वर्दी घातली आहेस, तरी लाज वाटली नाही का?’ अशा शब्दांत त्यांचा समाचार घेतला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, त्यामुळे पोलिस दलाच्या प्रतिमेला धक्का बसला आहे.

जिल्हा पोलिस अधीक्षक अर्चित चांडक यांनी प्रकरणाची गंभीर दखल घेत जाधव यांचे निलंबन केले. महिलेच्या जबानीवरून सिव्हिल लाईन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी पोलिस अधिकारी ठाण्यातून मागच्या दाराने फरार झाला असल्याने त्याच्या अटकेसाठी प्रयत्न सुरू आहेत.

या प्रकारामुळे अकोला पोलिस दलात खळबळ उडाली असून, महिला सुरक्षा आणि पोलिसांच्या वर्तनाबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत. पुढील तपास सुरू असल्याचे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले.

KDM NEWS प्रतिनिधी 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

**बनावट खतांच्या मोठ्या साठ्यावर कृषी विभागाची धडक कारवाई; सोलापूरमध्ये शेतकऱ्यांची लाखोंची फसवणूक उघड, दोघांवर गुन्हा दाखल**

**बार्शी बाजार समितीत शेतकऱ्यांची लूट: वरद ट्रेडर्सच्या चोरीचा व्हिडिओ व्हायरल, ड्रायव्हरांना कमिशन देऊन माल आणण्याचा गोरखधंदा**

मुख्याध्यापकांची निर्दोष मुक्तता: बार्शी न्यायालयाचा निकाल